पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ८८ धोकादायक इमारती व घरे असलेल्या मालकांना महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नोटीस बजाविल्यानंतर १३ घरमालकांनी दुरुस्ती करवून घेतली. एक अतिधोकादायक इमारत महापालिकेने पाडली. तर, ७४ जणांनी महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले आहे.
पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यासाठी महापालिकेकडून जुन्या इमारती, वाडे, घरे यांचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारती निश्चित केल्या जातात. यंदा शहरात ८८ धोकादायक इमारती आढळून आल्या. त्यात सहा इमारती अतिधोकादायक आहेत. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील धोकादायक इमारतींची सर्वाधिक ३७ संख्या आहे. महापालिकेने ८८ इमारतमालकांना धोकादायक बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत किंवा तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, अशा नोटीस बजावल्या होत्या. त्यांपैकी १३ इमारतींची मालकांनी दुरुस्ती करवून घेतली; तर एक इमारत महापालिकेने पाडली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ७४ धोकादायक इमारती शहरात आहेत.
या इमारतीच्या मालकांनी महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यात दोन अतिधोकादायक इमारती आहेत. आठ इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. १४ इमारती रिकाम्या न करता दुरुस्त होऊ शकतात, तर ५० इमारतींना किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. महापालिकेचे उपअभियंता अश्लेष चव्हाण म्हणाले, ‘महापालिकेने धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीस बजावली आहे. इमारतीची दुरुस्ती न केल्याने काही दुर्घटना घडली, तर त्यास इमारतमालक जबाबदार असतील.’