पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू केली असली, तरी या कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ, वाहने आणि इतर संसाधने उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. परिणामी, ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात कचरासंकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेकडे केली आहे.
‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला जवळपास तीन महिने उलटूनही ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचरा संकलन कामकाज पूर्णपणे सुरळीत झाले नाही. कचरा खाली करण्यासाठी वाहनांना चार ते पाच तास लागतात. अपुऱ्या वाहन संख्येमुळे कचरा संकलनाच्या फेऱ्या कमी होत आहेत. संबंधित ठेकेदारांकडून आवश्यक वाहने वेळेत उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. ‘ज’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रभाग क्रमांक १६, २५ आणि २६ चा समावेश असून, तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी या झपाट्याने विकसित होणाऱ्या परिसराचा समावेश आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कचरा संकलनासाठी आवश्यक वाहनांची संख्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि इतर सुविधा अपुऱ्या पडत असल्याने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधून नियमित कचरा संकलन होत नसल्याचे नगरसेवक कलाटे यांनी म्हटले आहे.
वाढत्या लोकसंख्येचा आणि नागरीकरणाचा विचार करून संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक प्रमाणात घंटागाड्या, कचरा संकलनासाठी वाहने, स्वच्छता कर्मचारी आणि इतर यंत्रसामग्री तातडीने उपलब्ध करून द्यावी. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या वाढवाव्यात, संबंधित ठेकेदारांच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या भागात नागरीकरण वाढत असताना सांडपाणी प्रक्रिया करणारे (एसटीपी) प्रकल्प अपुरे आहेत. परिणामी, मैलामिश्रित सांडपाण्याची योग्य प्रक्रिया न होता ते नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये सोडले जाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. यामुळे परिसरातील पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पुरेशा क्षमतेचे STP प्रकल्प उभारावेत, अस्तित्वातील प्रकल्पांची क्षमता वाढवावी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सोडले जाणार नाही, याची प्रशासनाने कठोर दक्षता घ्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे.
