पिंपरी : महापालिका निवडणुकीदरम्यान झालेली अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे महापालिका प्रशासनाच्या रडारवर आली असून, कारवाईचा हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांत १४३ अनधिकृत बांधकामे, एक हजार २६० फलक, १३ हजार ९७ किऑक्स, ११५ हातगाड्या, ६० टपऱ्या, दोन हजार ९९५ टेबल, वजन काटे, खुर्च्या, बाकडे, झेंडे व इतर साहित्य हटविण्यात व जप्त करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रक्रियेमुळे कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त होते. त्याचा फायदा घेऊन शहरातील अनेक ठिकाणी बांधकाम परवाना न घेता किंवा मंजूर नकाशाचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे माेठ्या प्रमाणात आल्या आहेत. शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे बकालपणा वाढत असल्याने प्रशासनाने याविराेधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभाेर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्थापत्य सहायकांची आढावा बैठक घेतली. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अनधिकृत बांधकामांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे. काम सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नाेटीस देऊन कारवाई तीव्र करण्याच्या सूचना सांडभाेर यांनी दिल्या आहेत.
अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास माेर्चा
मोशी प्राधिकरणातील सेक्टर ११ व १३ मधील उड्डाणपुलाखाली तसेच सीएनजी पंपालगत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. हातगाड्या, टपऱ्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्यामुळे नागरिकांना सेवा रस्त्याने चालावे लागते. वाहतूक कोंडीत भर पडते. नियोजित शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या रस्त्यावर संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात हातगाड्या व भाजी विक्रेते बसत असल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण होत आहे. हे अतिक्रण तत्काळ हटवावे. अन्यथा महापालिकेवर माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने दिला आहे.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ व मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे अतिक्रमण करू नये. भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. अनधिकृतपणे बांधकामे उभारणाऱ्यांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अतुल पाटील यांनी सांगितले.

