पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी, नवीन सांडपाणी वाहिनी, सांडपाण्याचा पुनर्वापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणीमोजणी, घनकचरा व्यवस्थापन अशी पाच हजार २९७ कोटी रुपयांची माेठी कामे पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्ज काढणार आहे. एक हजार २४६ काेटी ५० लाख रुपयांचा निधी कर्जाद्वारे उभारण्यात येणार आहे. हा निधी उभारल्यानंतर पालिकेला केंद्र सरकारचा शहरी आव्हान निधी (अर्बन चॅलेंज फंड) २५ टक्के निधी मिळणार आहे. विविध वित्तीय स्रोतांद्वारे निधी उभारण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव बुधवारी (४ नोव्हेंबर) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीसमाेर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिकेमार्फत शहरातील पाणीपुरवठा, जलनि:सारण, मलनि:सारण, इतर आवश्यक पायाभूत सुविधांशी संबंधित विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या शहरी आव्हान निधीतून २५ टक्के निधी मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के निधी कर्ज, कर्जराेखे आणि सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे (पीपीपी) अशा बाह्यस्रोताच्या माध्यमातून प्राप्त करणे अनिवार्य आहे. उर्वरित २५ टक्के म्हणजेच एक हजार १८८.९५ काेटींचा निधी महापालिका निधीतून खर्च केला जाणार आहे. शासनाचा २५ टक्के निधी मिळवण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिका एक हजार २४६ काेटी ५० रुपयांचे कर्ज घेणार आहे.
आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्रोतांद्वारे कर्ज उभारण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये पाणीपुरवठा आणि जलनि:सारण प्रकल्पासाठी कर्जाद्वारे निधी उभारणे, पाण्याचा पुनर्वापर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, हिशेबबाह्य पाणी हे प्रकल्प पीपीपी पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० टक्के काम पूर्ण झालेल्या मोशी रुग्णालयासाठी ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी कर्ज घेतल्यास शासनाकडून कोणताही निधी मिळणार नाही.
कोणत्या प्रकल्पासाठी किती खर्च?
पवना बंद जलवाहिनी – १४०० कोटी
जलनि:सारण सांडपाणी – १०९३ कोटी
हिशेबबाह्य पाणी – ६६६ कोटी
सांडपाणी पुनर्वापर – ७८५ कोटी
घनकचरा व्यवस्थापन – १३५३ कोटी
एकूण खर्च – ५२९७ कोटी
दर वर्षी दहा टक्के उत्पन्न वाढविण्याचे आव्हान
महापालिकेचे सन २०१९ पासून सहा टक्क्यांनी उत्पन्न वाढत आहे, तर महसुली खर्च १८ टक्क्यांनी वाढत आहे. उत्पन्न व खर्चवाढीचा दर हाच राहिल्यास सन २०२९-३० मध्ये भांडवली कामासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी निधी उपलब्ध राहणार नाही. त्यासाठी महापालिकेचे प्रतिवर्षी उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढवावे लागणार आहे. महसुली खर्चात प्रति वर्षात आठ टक्क्यांनीच वाढ करावी लागणार आहे. ही आर्थिक स्थिती नियमितपणे राखल्यास भांडवली कामासाठी व कर्जफेडीसाठी निधी उपलब्ध हाेणार आहे.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध वित्तीय स्रोतांद्वारे निधी उभारणे समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या समितीचे सचिव असून, तीन अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा परीक्षक, कायदा सल्लागार, प्रकल्पाशी संबंधित विभागाचे प्रमुख या समितीचे सदस्य असणार आहेत.
३३७ कोटींचे कर्ज
महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण, पर्यावरण, विद्युत विभागांच्या कामांपोटी ठेकेदारांना देयकांपोटी द्यावी लागणारी देणी (दायित्व) चार हजार कोटी रुपये आहेत. कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी १५९ कोटी ९१ लाख रुपयांचे जागतिक बँकेचे कर्ज अद्याप फेडले जात आहे. मुळा नदीसुधार, हरित सेतू आणि टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिझाइनद्वारे सुशोभीकरण करण्यासाठी कर्जरोखे उभारले आहे. महापालिकेवर ३३६ कोटी ८९ लाखांचे कर्ज आहे.
शहरी आव्हानमधून निधी मिळवण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के निधी महापालिका उपलब्ध करणार आहे. त्यासाठी एक हजार २४६ काेटी ५० लाखांचे कर्ज उभारणार आहे. त्यातून पाणी, कचरा हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. कर्ज काढण्यासाठी दर वर्षी महापालिकेचे १० टक्के उत्पन्न वाढणे अपेक्षित असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी सांगितले.
…
