पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक इंधन व्यवस्थेकडे नेण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाईप नैसर्गिक गॅसचा (पीएनजी) वापर वाढविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवडला देशातील पहिले ‘एलपीजी विरहित शहर’ बनविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्या, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड तसेच नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे, एलपीजी गॅसवरील अवलंबित्व कमी करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी तसेच सहकार विभागाचे उपनिबंधक यांच्याबरोबर महापालिका प्रशासनाने संयुक्त बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहायक सहकार अधिकारी शशिकांत शृंगारे, बाळासाहेब घुगे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शंकर कुमार, गृहनिर्माण सोसायट्यांचे सुहास पटवर्धन, सचिन लोंढे, संजीवन सांगळे या वेळी उपस्थित होते.

एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. नैसर्गिक वायू हा सुरक्षित, सातत्याने उपलब्ध होणारा आणि आधुनिक शहरी जीवनशैलीस पूरक पर्याय आहे. पाईप गॅस प्रणालीमुळे सिलिंडर साठवणुकीची गरज राहत नाही. गॅस पुरवठा अखंडित राहतो, वेळेची बचत होते तसेच पर्यावरणीय दृष्टीनेही हा पर्याय अधिक परिणामकारक आहे. शहराच्या शाश्वत आणि स्मार्ट विकासाच्या दृष्टीने पाईप गॅसचा वापर वाढविणे हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास आयुक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

जनजागृती मोहीम

नागरिकांमध्ये पाईप गॅसबाबत विश्वास आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. समाजमाध्यमे, माहिती पत्रकांचे वितरण, प्रशिक्षण शिबिरे, प्रत्यक्ष सोसायटी भेटी तसेच घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांच्या शंका, तांत्रिक अडचणी आणि पाईप गॅस जोडणीबाबतच्या प्रक्रियेची माहिती देण्यासाठी एमएनजीएलच्या वतीने समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.

ज्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘एमएनजीएल’ची गॅस जोडणी असूनही नागरिकांकडून प्रत्यक्ष वापर केला जात नाही. अशा सोसायट्यांना प्राधान्याने लक्ष करून विशेष मोहीम राबविण्यात येईल. हा गॅस वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांनी पुढाकार घेत जास्तीत जास्त सदनिकाधारकांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.