पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपून चार वर्षांनी नगरसेवकांच्या हाती कारभार जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापाैर निवड हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चार वर्षांपासून बंद असलेली पदाधिकाऱ्यांची दालने खुली केली असून सज्ज करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. दालने, महासभेचे सभागृह स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
भाजपने ८४ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सभापती तसेच, शिक्षण, विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा या विषय समिती सभापती या पदावर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. विराेधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाला मिळणार आहे.
प्रशासकीय राजवटीत महापालिका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील पदाधिकाऱ्यांच्या काही दालनाचा वापर अधिकाऱ्यांकडून केला जात हाेता. सत्तारुढ पक्षनेते, विराेधी पक्षनेते, उपमहापाैर, विधी समितीसह विविध समित्यांची दालने अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली हाेती. ही दालने रिकामी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापाैर, स्थायी समिती अध्यक्षांचे दालन चार वर्ष कुलूपबंद हाेते. आता पदाधिकारी येणार असल्याने या दाेन्ही दालनांसह सर्व दालने सज्ज करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वीय सहायक, मुख्य लिपिक, लिपिक, वाहनचालक, शिपाई यांची नेमणूक केली जाते. एकूण ३५ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
अधिकाऱ्यांसाठी दालनाची शाेधाशाेध
सत्तारुढ पक्षनेत्याच्या दालनात उपायुक्त अण्णा बोदडे, क्रीडा समिती सभापतीच्या दालनात उपायुक्त संदीप खाेत, विराेधी पक्षनेत्याच्या दालनातून सहायक आयुक्त अतुल पाटील आणि विधी समिती सभापतीच्या दालनातून विशेष अधिकारी किरण गायकवाड कामकाज करत हाेते. त्यांच्यासाठी आता नवीन दालनांची व्यवस्था करावी लागणार आहे.
पदाधिकाऱ्यांसाठीची दालने सुसज्ज केली जात आहेत. पदाधिकाऱ्यांच्या दालनातून कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी नवीन दालनांची व्यवस्था करण्यात येईल. लवकरच दालन वाटप समितीची बैठक घेण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खाेराटे यांनी सांगितले.
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक
महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी यशस्वी रणनिती अवलंबून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली. भाजपचे सर्वाधिक ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
