पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्याच्या सुरक्षेकरिता दोन वर्षांसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावावरून टीकेची झोड उठल्यानंतर स्थायी समितीने बुधवारी एक पाऊल मागे घेतले. प्रशासनावर खापर फोडून हा विषय दप्तरी दाखल केला.
स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी पार पडली. अध्यक्ष अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या मागणीनुसार त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) यांच्याकडून दोन वर्षांसाठी नऊ सुरक्षारक्षक घेतले जाणार हाेते. एका सुरक्षारक्षकाला दरमहा ३४ हजार ६५० रुपये याप्रमाणे सुरक्षा रक्षकांच्या दोन वर्षांच्या वेतनासाठी ७४ लाख ८५ हजार ४०० रुपये खर्च होणार होता. याला वाढता विरोध पाहता हा विषय प्रशासनाने आणल्याचे सांगून स्थायी समितीने ते थेट दप्तरी दाखल केला.
‘‘मेस्को’कडे निवृत्त सैनिक असतात. पदाधिकारी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात. तेव्हा त्यांचे सत्कार हाेतात. त्या वेळी निवृत्त सैनिकांकडे सत्काराचे हार देणे याेग्य नाही. त्यामुळे ‘मेस्काे’चे सुरक्षारक्षक नेमण्याचा विषय दप्तरी दाखल केला आहे,’ असे बारणे यांनी सांगितले.
महापौरांचा दौरा रद्द
अझरबैजानची राजधानी बाकू येथे १७ ते २२ मेदरम्यान होणाऱ्या संमेलनात १९४ देशांतील अधिकारी, महापाैर सहभागी हाेणार होते. या अभ्यास दौऱ्यासाठी महापौर रवी लांडगे जाणार होते. मात्र, लांडगे यांनी रात्री उशिरा दौरा रद्द केल्याचे जाहीर केले.
वाहन खर्च प्रतिपूर्तीचा प्रस्तावही ‘दप्तरी’
वाहन किंमत, देखभाल-दुरुस्ती, इंधन, वाहनचालकांचे वेतन व इतर दरांमध्ये वाढ झाल्याचे कारण पुढे करून महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना वाहन खर्च प्रतिपूर्तीची रक्कम वाढवून, ती दरमहा ५० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठवला होता. याला विरोध वाढल्यानंतर हा प्रस्ताव १५ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत दप्तरी दाखल करणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. या प्रस्तावाला माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आक्षेप घेतला होता.
‘एका व्यक्तीसाठी महिन्याला ५० हजार रुपये म्हणजे साधारण ४५० ते ५०० लिटर इंधन वापरले जाईल. इतके इंधन वापरले, तर मोटार महिन्याला नऊ हजार किलोमीटर धावू शकते. म्हणजे अधिकारी दररोज ३०० किलोमीटर प्रवास करतात का,’ असा सवाल त्यांनी ‘एक्स’ मंचावर उपस्थित केला.
