पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून रवी लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोघांचे नाव निश्चित केले आहे. आज (सोमवारी) दोघेही उमेदवारी अर्ज दाखल केला करणार आहेत. भाजपची एकहाती सत्ता असल्याने दोन्ही उमेदवारांची निवड निश्चित मानली जात असून शुक्रवारी (६ फेब्रुवारी) अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. महापाैर पदाचे आरक्षण खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी ( २ फेब्रुवारी) दुपारी तीन ते पाच ही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

भाजपने प्रभाग सहा धावडेवस्ती-भगतवस्तीमधून सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे यांनी महापौर आणि प्रभाग १९ – आनंदनगर, गावडे पार्क प्रभागाचे प्रतिनिधीत्व करित असलेल्या शीतल शिंदे यांनी उपमहापौरपदाची उमेदवारी निश्चित केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या दोघांचे नाव निश्चित केले आहे. त्यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार दोन्ही उमेदवारांकडून लवकरच महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.

महापौर, उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक

महापाैर-उपमहापाैरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या दिवशी महापालिकेत सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा हाेणार आहे. सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सहकार आयुक्त दिपक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले जाईल.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत.

भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचा गटनेता हा सभागृह नेता असणार आहे.  प्रशांत शितोळे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. या पक्षाकडून ते तीनवेळा नगरसेवक होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी गावठाणमधून ते भाजपकडून निवडून आले आहेत. त्यांची ही चौथी टर्म आहे. शितोळे हे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय मानले जातात.