पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याचे’, आदेश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत. ‘महापालिकेच्या विविध विभागांतील कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. मात्र, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनेक अधिकारी आणि कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ एकाच विभागात अथवा एकाच पदावर ठाण मांडून बसले आहेत.

स्थापत्य, पर्यावरण, नगररचना, बांधकाम परवाना, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार आणि उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लेखापाल, भांडारपाल व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

एकाच विभागात दीर्घकाळ राहिल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्थानिक स्तरावर हितसंबंध निर्माण झाले आहेत. यामुळे प्रशासकीय कामांत ‘अर्थपूर्ण वाटाघाटी’ आणि भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. हे महापालिकेच्या प्रतिमेसाठी अत्यंत घातक आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतरही नियमानुसार त्यांची बदली दुसऱ्या विभागात होणे अपेक्षित होते. मात्र, विभागप्रमुखांच्या मर्जीतील असल्याने पदोन्नती मिळूनही ते त्याच जुन्या विभागात कार्यरत आहेत’, असे महापौर लांडगे यांनी म्हटले आहे.

‘विभागप्रमुखांकडून मर्जीतील कर्मचाऱ्यांना सोडण्यास होणारा विरोध आणि प्रशासनाचे या विषयाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडत आहे. यामुळे पारदर्शकतेला हरताळ फासला जात आहे. यासाठी एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने इतरत्र बदली करून प्रशासनात फेरबदल करण्यात यावेत. या विषयाचे गांभीर्य ओळखून आपण तात्काळ कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा अहवाल महापौर कार्यालयास सादर करावा’, अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.

शैक्षणिक साहित्य भेट देण्याचे आवाहन

‘शुभेच्छा देताना कुणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू घेऊन येऊ नये. त्याऐवजी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल अशी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू द्याव्यात’, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

महापौर लांडगे म्हणाले, ‘हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. यातून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत मिळणार असून, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत साधनांची पूर्तता होण्यास हातभार लागणार आहे. औपचारिक शुभेच्छांऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुंतवणूक करण्याचा हा सकारात्मक व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संदेश आहे.’

‘महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बळ वाढावे, त्यांना आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे आणि समाजामध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा’, असे आवाहन महापौर लांडगे यांनी केले आहे.