पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरात पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी नाल्यांमध्ये साचलेला गाळ काढला आहे. पावसाळापूर्व कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. नालेसफाई मोहिमेमुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरळीत राहण्यास मदत होईल. पाणी तुंबणे व स्थानिक पूरस्थितीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होईल,’ असा दावा महापालिका प्रशासनाने केला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, रस्ते, स्वच्छता व्यवस्था, पालखी सोहळा तयारीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपायुक्त सचिन पवार, व्यंकटेश दुर्वास आदी या वेळी उपस्थित होते.
पावसाळ्यात दर वर्षी नाल्यांमध्ये साचणारा गाळ, प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो आणि अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी स्थानिक पूरस्थितीही निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा नालेसफाईचे नियोजन अधिक काटेकोर केले असून, संवेदनशील आणि पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. शहरातील एकूण १४१ नाले आणि ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची ९२.३३ टक्के सफाई पूर्ण झाली आहे.
संवेदनशील भागांमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे
‘ज्या ठिकाणी पाणी साचण्याची किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा संवेदनशील भागांमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याची खात्री करावी. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची खात्री करावी. नाल्यांची रुंदी, खोली आणि पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेचा विचार करावा आणि अहवाल सादर करावा,’ अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
‘पालखी मार्गावरील अतिक्रमण हटवा’
‘पालखी मार्गावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, रस्त्यांची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत, दिंड्यांचा मुक्काम आणि विसावास्थळी २४ तास स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध राहील यासाठी आवश्यक व्यवस्था करावी,’ अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
नालेसफाईची कामे केवळ प्रमाणावर न पाहता गुणवत्तेच्या निकषांवरही तपासली जात आहेत. नाल्यांमधून काढलेला गाळ आणि कचरा तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. पावसाळ्यात समस्या निर्माण होऊ शकणाऱ्या संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
