पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील एका स्वच्छतागृहात सापडलेली मद्याची बाटली आणि नागरिकांची हाेणारी गर्दी लक्षात घेऊन, सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने मंत्रालयाच्या धर्तीवर महापालिकेतील प्रवेशासाठी ‘ॲप’ विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या ‘ॲप’च्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर महापालिकेत प्रवेश मिळणार आहे.
शहरातील नागरिक, ठेकेदार महापालिकेत दरराेज विविध कामांसाठी येत असतात. अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी मंगळवार आणि गुरुवार असे दाेन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही नागरिकांची विविध कामांसाठी दरराेज गर्दी होते. सद्य:स्थितीत प्रवेशद्वारावर कागदी पास तयार करून नागरिकांना महापालिकेत प्रवेश दिला जातो. मात्र, वाढती गर्दी आणि स्वच्छतागृहात मद्याची बाटली आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, मंत्रालयाच्या धर्तीवर ॲप विकसित करण्याचे काम सुरू आहे.
‘ॲप’चा वापर कसा करता येणार?
ॲप विकसित झाल्यानंतर नागरिकांना ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटायचे आहे, त्यांची ॲपवर नोंदणी करून घरूनच वेळ घेता येणार आहे. ॲप वापरताना नागरिकांना त्यांचे नाव, पत्ता, माेबाइल आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. मोबाइलवर आलेल्या ‘ओटीपी’च्या माध्यमातून ‘क्यूआर काेड’ येईल. हा ‘क्यूआर काेड’ महापालिका प्रवेशद्वारावर दाखवून प्रिंट काढता येईल. ही प्रिंट मिळाल्यानंतर नागरिकांना महापालिकेत प्रवेश मिळणार आहे. तसेच, ज्या दिवशी अधिकाऱ्यांची वेळ घेतली असेल, त्या दिवशीच प्रवेश मिळेल.
सुरक्षिततेसाठी अन्य उपाय
- कार्यालयीन वेळेनंतर प्रवेश नाही.
- महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, विविध ठेकेदारी संस्थांचे कर्मचारी आदींना ओळखपत्राशिवाय महापालिकेच्या कार्यालयांमध्ये प्रवेश नाही.
- कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांच्या बॅगांची यंत्राद्वारे तपासणी.
- मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुख्यालयात वाहने लावण्यास मनाई.
- हलगर्जीपणा झाल्यास सुरक्षारक्षक व सुरक्षा पर्यवेक्षकावर कारवाई.
सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेतील प्रवेशासाठी मंत्रालयाच्या धर्तीवर ‘ॲप’ विकसित करण्यात येत आहे. आयुक्तांना ‘ॲप’चे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘ॲप’चे उद्घाटन करण्याचा प्रयत्न असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभाेर यांनी सांगितले.
