पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात एकूण ३५ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली. या गुंडांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आयुब चमन खान (रा. अंकुश चौक, निगडी), विशाल उर्फ ढेंगाल्या रामधन खरात (रा, ओटास्किम, निगडी), रोहन उर्फ गंग्या वासुदेव वाघमारे (रा. पवारनगर, थेरगाव), मयूर सुहास मुर्हे (रा. सोमाटणे, मावळ), यशोदास विजय राठोड, आकाश रवी मैनावत (दोघे रा. ओझर्डे, मावळ), ऋतिक बन्सी ढसाळ, गौरव उर्फ बॉक्सर बन्सी ढसाळ, रोहित महादेव सोनवणे (तिघे रा. वाकड), धीरज दादा वाघमारे (रा. थेरगाव), अमन अमीन शेख (रा. देहूरोड), मंगलसिंग पोलादसिंग भोंड (रा. आदर्शनगर, दिघी), अशोक उर्फ नन्या सोतल गोंधने, रोहित बापू पारवे, बालाजी शिंदे, अरुण अनिल गोटे (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी), नितीन पोपट तांबे (रा. निमगाव, खेड), विक्रांत विठ्ठल राऊत (रा. मामुर्डी, देहूरोड), योगेश दत्ता लहाने (रा. मोरेवस्ती, चिखली), केतन प्रकाश शिंदे (रा. आळंदी) यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
आकाश अतुल कदम (रा. अंकुश चौक, निगडी), शुभम उर्फ सोन्या सुनील गायकवाड (रा. गांधीनगर, पिंपरी), अनिकेत दत्ता वाघमारे (रा. नेहरूनगर, पिंपरी), शुभम बबन नावळे (रा. पिंपळे गुरव), प्रशांत अरुण दुबे (रा. तळेगाव दाभाडे), अरुणा गब्बर राजपूत (रा. कोयाळी, खेड), परशुराम प्रदीप ढेपे, हरिओम लक्ष्मण जोगदंड (दोघे रा. भोसरी एमआयडीसी), पायल रोहित कुंभार (रा. डुडुळगाव), सनी विजय शहा (रा. नारायणगाव, जुन्नर) यांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. तसेच, गंगाधर देवेंद्र नाटेकर (रा. रमाबाईनगर, रावेत), अजय सुखदेव माने (रा. धानोरी), अर्जुन पूनम कुंभार (रा. निंबाळकरनगर, ताथवडे), सागर उर्फ रत्नदीप सत्यवान कांबळे (रा. बालाजीनगर, भोसरी), राजकुमार राममूरत बिंद (रा. चाकण) या गुंडांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
गुन्हेगारांची कुंडली तयार
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनीही सूक्ष्म नियोजन सुरु केले आहे. त्यासाठी गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. निवडणुकीपूर्व वातावरण बिघडू नये म्हणून पोलिसांनी तयार केलेल्या १५९ महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या यादीत राजकारणाशी संबंध असलेल्या काही जणांचाही समावेश आहे. या नेत्यांचा पूर्वीच्या वादात सहभाग, त्यांच्या समर्थकांची गर्दी, निवडणूक काळात निर्माण होणारा तणाव आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या सर्व बाबींचा विचार करून त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
संवेदनशील केंद्रांची नव्याने छाननी
मागील निवडणुकांत झालेला वाद, गोंधळ आणि बूथकब्जा प्रयत्नांचा सखोल अभ्यास करून संवेदनशील केंद्रांची नव्याने छाननी करण्यात येत आहे. सांगवी, भोसरी, वाकड-थेरगाव आणि पिंपरी बाजार परिसरातील काही बूथची ‘अत्यंत संवेदनशील’ म्हणून नोंद आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त, गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे ठेवण्याबाबतचा आढावा सुरू आहे. सन २०१७ च्या निवडणुकीत घडलेल्या घटनांच्या भागात अधिक पोलीस, वाहतूक नियंत्रण आणि त्वरित प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
