पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला अखेर पाच महिन्यांनी पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. महापालिका आयुक्तपदी काेकण विभागीय आयुक्त डाॅ. विजय सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडील आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार काढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली होती. महामेट्राेचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मागील पाच  महिन्यांपासून हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार हाेता.

हर्डीकर यांच्याकडून केवळ आवश्यक कामांनाच प्राधान्य दिले जात हाेते. त्यामुळे प्रशासकीय कामकाज संथगतीने सुरू हाेते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून महापाैर रवी लांडगे यांनी पूर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हाेती. त्यानुसार महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. 

काेकण विभागीय आयुक्त डाॅ. विजय सुर्यवंशी यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी जारी केला आहे.