पिंपरी : राजकीय विरोध, पोलिसांचा असहकार, पोलिसांकडून वाहनांवर कारवाईस टाळाटाळ आणि दमदाटीचे वाढलेले प्रकार यामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यासाठी आणलेले सशुल्क वाहनतळ (पे अँड पार्क) धोरण गुंडाळल्यानंतर आता संपूर्ण शहरासाठी नव्याने वाहनतळ धोरण आणण्यात येणार आहे. मागील धोरणातील त्रुटींमध्ये सुधारणा करून नव्याने सर्वंकष आराखडा तयार केला आहे. तीन टप्प्यांत त्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन असून, यामुळे शहर कोंडीमुक्त होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

या धोरणाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्दळीची ठिकाणे, त्यानंतर वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध आहे तिथे आणि तिसऱ्या टप्प्यात कामे पूर्ण झालेल्या रस्त्यांवर वाहनतळ धोरण राबविण्यात येणार आहे. विकासकामे सुरू असलेल्या रस्त्यांवर कोंडीत भर पडू नये यासाठी सुरुवातीला धोरण राबविले जाणार नाही.

रस्त्यावरील पार्किंगसाठी जास्त दर

रस्त्यावरील पार्किंगसाठी जास्त शुल्क ठेवण्यात येणार आहे. तासाला दहा रुपये शुल्क आकारले जाईल. पुलाखाली, माेकळ्या जागांवर असलेल्या पार्किंगसाठी कमी दर ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यापेक्षा पुलाखाली आणि माेकळ्या जागांवरील पार्किंगला प्राधान्य देतील. वाहतूक काेंडीत भर पडू नये, पादचाऱ्यांना चालण्यासाठी प्रशस्त रस्ते मिळावेत, यासाठी रस्त्यावरील पार्किंगसाठी जास्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले.

वाहनतळाची तपासणी

खासगी व्यावसायिक इमारतींमध्ये वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी परवानगी दिली जाते. या इमारतींमधील वाहनतळ सुरू आहे का, हे बांधकाम विभागाकडून तपासले जाणार आहे. वाहनतळ उपलब्ध नसल्यास कारवाई केली जाणार आहे.

काय आहे धोरणात?

  • अनावश्यक पार्किंग टाळण्यासाठी उपग्रहांद्वारे जागांची पडताळणी
  • परिसराच्या गरजेनुसार वाहनतळाचे नियोजन
  • ‘कलर कोडिंग सिस्टीम’
  • रस्त्यालगत घर असणाऱ्या रहिवाशांसाठी विशेष ‘पार्किंग परवाना’
  • मुख्य रस्त्यांवरील जड, अवजड वाहनांचे पार्किंग पूर्ण बंद
  • देखरेखीसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्थापन कक्ष
  • वाहनचालक, पादचारी, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र, सुरक्षित जागा

पूर्वीच्या धोरणाची अर्धवट अंमलबजावणी झाली. त्यामुळे सर्वंकष वाहनतळ धोरण आखले आहे. आता संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने वाहनतळ धोरण राबविले जाणार आहे. वाहतूक पोलिसांशी चर्चा केली आहे. यामुळे शहरातील कोंडी कमी होईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

वाहनतळ धोरण राबविण्यासाठी काही रस्ते शहरी दळणवळण विभागाने निवडले आहेत. काही रस्त्यांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रभागातील नगरसेवकांचे अभिप्राय घेण्याबाबत सुचविले आहे. धोरण राबविताना काही अडचणी येतील का, या बाबत नगरसेवकांचे मत विचारात घेण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी सांगितले.

शहर वेगाने वाढत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ तात्पुरते उपाय करून चालणार नाही. शाश्वत, शिस्तबद्ध यंत्रणा उभारण्यात येणार आहे. हे धोरण राबविताना केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढाच हेतू नसून, पादचारी आणि सायकलस्वारांनाही सुरक्षित रस्ते मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.