पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दोन नवीन क्षेत्रीय कार्यालयांच्या निर्मितीचा आदेश नव्याने काढला आहे. त्यामुळे एक जुलैपासून शहरात दहा क्षेत्रीय कार्यालये कार्यरत राहतील.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक निवडीच्या विषयाला भाजपने दोन नवीन क्षेत्रीय कार्यालय निर्मितीची उपसूचना दिली होती. या विसंगत उपसूचनेच्या आधारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन नवीन क्षेत्रीय कार्यालयाची निर्मिती करण्याचा आदेश दिला. त्यानुसार २५ मेपासून कार्यालये कार्यान्वित केली जाणार होती. परंतु, विसंगत उपसूचना आणि सभावृत्तान्त कायम होण्याअगोदर आयुक्तांनी या आदेशावर स्वाक्षरी केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय निर्मितीचा आदेश रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजप आणि आयुक्तांवर आली हाेती.
मे महिन्यात नव्याने उपसूचना देण्यात आल्यानंतर दोन नवीन क्षेत्रीय कार्यालये निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेची शहरात सध्या आठ क्षेत्रीय कार्यालये असून, त्यासाठी स्वत:च्या इमारती नसल्याने आयटीआय, तसेच प्राधिकरणाच्या इमारतींमध्ये काही कार्यालये सुरू आहेत. तेथील कर्मचाऱ्यांची दहा क्षेत्रीय कार्यालयांत विभागणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवले जाईल. सध्या आठ सहायक आयुक्त म्हणजेच क्षेत्रीय अधिकारी आहेत. आणखी दोन सहायक आयुक्त नेमावे लागणार असून, एक जुलैपासून नवीन कार्यालये सुरू केली जातील.
क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे
शहरातील क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. ‘अ’ : राजगड, ‘ब’ : सिंहगड, ‘क’ : विजयदुर्ग, ‘ड’ : देवगिरी, ‘ई’ : शिवनेरी, ‘फ’ : तोरणा, ‘ग’ : पुरंदर, ‘ह’ : प्रतापगड, ‘ज’ : रायगड आणि ‘ल’ : लोहगड अशी नावे देण्यात आली आहेत.
नवीन कार्यालये ताथवडे, संत तुकारामनगरमध्ये
महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये सध्याच्याच इमारतींमध्ये सुरू राहतील. नवे ‘ज’ (रायगड) क्षेत्रीय कार्यालय ताथवडेतील महापालिकेच्या वाहनतळ इमारतीमध्ये, तर ‘ल’ (लोहगड) क्षेत्रीय कार्यालय संत तुकारामनगर पाेलीस ठाण्यासमोरील ‘म्हाडा’च्या गाळ्यात असेल.
पिंपरी-चिंचवडमधील नालेसफाई पूर्णत्वाकडे
पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाईचे काम ९७ टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील तीन टक्के काम शिल्लक आहे. शनिवारपर्यंत शंभर टक्के नालेसफाई पूर्ण होईल, असा दावा आरोग्य विभागाने केला. महापालिका आयुक्तांनी शहरातील नाले, नदीपात्राची पाहणी केली.
शहरात एप्रिल महिन्यात नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले. सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या आरोग्य विभागाकडून नालेसफाईचे काम केले जात आहे. शहरात लहान व मोठे असे एकूण १४१ नाले आहेत. या नाल्यांची एकूण लांबी ९१.५ किलोमीटर इतकी आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी विविध नाले आणि नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेतला. ‘नालेसफाईची कामे तत्काळ पूर्ण करावीत, सखल भागात पाणी साचू नये व पूरस्थिती टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात,’ अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी नदी व नाल्यांच्या वहनक्षमतेबाबत माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणांची दखल घेऊन तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, सहायक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड यावेळी उपस्थित होते.
