पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे बंधनकारक असतानाही १३१ सोसायट्यांमधील प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने या सोसायट्यांना नोटिसा दिल्या असून, तत्काळ प्रकल्प सुरू करावेत, अन्यथा, साेसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार होत असल्याने पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरवासीयांना प्रतिदिन ६५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी दिले जाते. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मोठ्या साेसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे काही साेसायट्यांचा पाण्याचा दरमहा खर्च सव्वा लाख ते दीड लाख रुपयांवर गेला आहे. एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) २० हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्था, हॉटेलला पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरात ४९४ मोठ्या सोसायट्या

शहरात ४९४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांपैकी ३६३ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत, तर ‘एसटीपी’ सुरू करण्याचे वारंवार आवाहन करूनही १३१ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंदच आहेत. यामध्ये काही साेसाट्यांना पहिली, तर काही साेसायट्यांना दुसरी, तिसरी नाेटीस महापालिकेने बजावली आहे. त्यानंतरही या साेसायट्या खर्चासह विविध कारणे देऊन ‘एसटीपी’ बंद ठेवत असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

मिळकतकरात सवलत

प्रकिया केलेल्या पाण्याचा वापर झाल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी कमी होऊन, शहरातील पाणीपुरवठ्याचा वाढता ताण कमी होण्यास मदत होईल. ‘एसटीपी’ कार्यान्वित करून पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेकडून मिळकतकराच्या देयकात सवलतही दिली जाते. मात्र, त्यानंतरही साेसायटीधारक ‘एसटीपी’ कार्यान्वित करत नाहीत. पुढील काही दिवसांत पुन्हा एकदा साेसाट्यांमधील ‘एसटीपी’ सुरू आहेत की नाही, याची तपासणी केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता याेगेश आल्हाट यांनी सांगितले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याबाबत साेसाट्यांना वारंवार आवाहन केले आहे. त्यांच्या अडचणी समजावून घेऊन सहकार्य करण्यात आले. मात्र, १३१ साेसायट्यांच्या प्रतिनिधींकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना नाेटीस देण्यात आली. त्यानंतरही ‘एसटीपी’ सुरू न केल्यास त्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जाईल असा इशारा मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

साेसायटीधारकांना ‘एसटीपी’ सुरू करण्यासाठी काही तांत्रिक मदत लागली, तर करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सवलतीच्या दरामध्ये ग्रीन वीज मीटर मिळते, त्यासाठी महापालिकेच्या वतीने पत्र दिले जात आहे. ज्या साेसाट्यांमध्ये ‘एसटीपी’ कार्यान्वित आहेत, त्यांना सामान्य करात तीन टक्के सवलत देण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता याेगेश आल्हाट यांनी सांगितले.