पिंपरी : महापौर, उपमहापौरांनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते देखील सुरक्षेत फिरणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) यांच्याकडून दोन वर्षांसाठी नऊ सुरक्षा रक्षक घेतले जाणार आहेत. एका सुरक्षा रक्षकाला प्रतिमहिना ३४ हजार ६५० रुपये वेतन दिले जाणार असून, दोन वर्षांसाठी ७४ लाख ८४ हजार ४०० रुपये खर्च येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर यांना यापूर्वीच सुरक्षा देण्यात आली असून, त्यांच्याबरोबर एक सुरक्षारक्षक असतो. त्याशिवाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे यांनाही एका सुरक्षा देण्यात आला आहे. आता स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनाही त्यांच्या मागणीनुसार सुरक्षा देण्यात येणार आहे. दालनात नागरिकांची वर्दळ असते. विविध संघटना समस्या घेऊन येतात. त्यामुळे ही पदे महत्त्वाची असल्याचे सांगून सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी तिन्ही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे एक एप्रिल रोजी केली होती.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाने पुणे महापालिकेतील सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तिथे या तिन्ही पदावरील व्यक्तींच्या मागणीनुसार सुरक्षा कर्मचारी पुरविण्यात येत असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांना मागणीनुसार सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. महापालिका आस्थापनवेरील सुरक्षा रक्षक निवृत्त झाल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे उपमहापौरांनाही मेस्कोद्वारे सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (१३ मे) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
प्रेक्षागृहाला सुरक्षा
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नामांकित सिने, नाट्य अभिनेत्यांच्या नाटकाचे प्रयोग होत असतात. त्यामुळे नाट्य रसिक, अभिनेत्यांच्या चाहत्यांची गर्दी होते. त्यामुळे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी प्रेक्षागृहाच्या व्यवस्थापकाने केली आहे. त्यानुसार दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. दोन वर्षांसाठी १६ लाख ६३ हजार २०० रुपये खर्च येणार आहे.
तिन्ही पदाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. पाळ्यांमध्ये (शिफ्ट) दोन सुरक्षा रक्षक दिले जाणार आहेत. सुरक्षा रक्षक हे पदाधिकाऱ्यांबरोबर किंवा त्यांच्या दालनात राहतील, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी सांगितले.
महापालिका कर्जबाजारी असून, चार हजार कोटी रुपयांचे देणे (दायित्व) आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगणारे पदाधिकारी आता स्वत:च्या सुरक्षेवर लाखो रुपयांचा खर्च करित आहेत. ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे. पदाधिकाऱ्यांना कोणाची भीती आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.
