पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी आणि पाणी शुद्ध करत नसल्याचा ठपका ठेवून आकारलेल्या दंडाच्या रकमेची थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिल्यानंतर महापालिकेने २० कोटी रुपयांची थकबाकी शुक्रवारी (२७ मार्च) भरली. त्यामुळे तूर्तास पाणीपुरवठा खंडित होण्याचे संकट टळले आहे.

मावळातील पवना धरणातून महापालिका ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध पाणी दिवसाला उचलते. या पाण्याची पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडून आकारली जाते. तसेच, महापालिका पाणी शुद्ध करत नसल्याने दंडही आकारला जात आहे. पाणीपट्टी आणि २७५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया न करता पाणी नदीत साेडले जाते, याबाबतचा दंड, अशी १४३ काेटींची थकबाकी झाली हाेती.

ही थकबाकी भरण्याबाबत १७ मार्चला जलसंपदा विभागाने नाेटीस दिल्यानंतर महापालिकेने १९ मार्च रोजी सात काेटी रुपयांचा भरणा केला. उर्वरित १३६ काेटी रुपयांची थकबाकी तातडीने भरावी, अन्यथा दोन दिवसांत पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतर शहरातील लोकप्रतिनिधींची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत १३५ कोटी रुपयांची थकबाकी महापालिकेने भरण्याचा निर्णय झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारी २० कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. त्यामुळे तूर्त पाणीपुरवठा खंडित होण्याचे संकट टळले आहे.

पाणीपट्टीची रक्कम थकविली जात नाही. सात कोटी रुपयांची पाणीपट्टी पूर्वीच भरली आहे. पाणी शुद्ध करत नसल्यामुळे आकारलेल्या दंडाची २० कोटी रुपयांची थकबाकी जलसंपदा विभागाकडे भरली आहे. केवळ दंडाची रक्कम थकीत असल्याने पाणीपुरवठा खंडित करता येणार नाही, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मोराणकर यांनी सांगितले.

महापालिकेने १३६ कोटींपैकी २० कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे. ११६ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही थकबाकी भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तूर्तास पाणीपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.