पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे शहर विकासात माेठे याेगदान आहे. कर्तृत्व संपन्न, महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व हरपले आहे. कामकाज सुरु असलेल्या महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर अजित पवार यांचा ब्रॉंझचा पुतळा उभारला जाईल. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अजित सृष्टी उभारण्यात येईल. सद्याच्या महापालिका सभागृहात त्यांचे तैलचित्र बसविले जाईल, अशी घोषणा महापालिकेच्या पहिल्याच विशेष सभेत शुक्रवारी करण्यात आली.
महापाैर आणि उपमहापाैरांची निवड झाल्यानंतर विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, ‘अजित पवार यांच्या जाण्याने माेठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादांचे तैलचित्र सभागृहात बसवावे. नवीन इमारती समोर त्यांचा पुतळा उभारावा. महापौरपदाची खुर्ची काटेरी आहे. महापालिकेत काम करत असताना विरोधाला विरोध न करता काम केले जाईल. सत्ताधाऱ्यांनी शहर विकासाचा आराखडा तयार करावा. शहर बकाल होत चालले असून आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण आहे’.
भाेईर यांच्या प्रस्तावाला सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी अनुमोदन दिले. ते म्हणाले, ‘शहराला गती देण्याचे काम अजितदादांनी केले. कर्तृत्व संपन्न, महाराष्ट्राला दिशा देणारे नेतृत्व हरपले आहे. प्रस्तावित महापालिका इमारतीसमोर हेवा वाटेल असा अजितदादांचा ब्रॉंझचा पुतळा उभारला जाईल. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अजित सृष्टी उभारण्यात येईल. सद्याच्या महापालिका सभागृहात तैलचित्र बसविले जाईल’, अशी घाेषणाही त्यांनी केली.
सभा २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब
महापालिकेची विशेष सभा २० फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्याची सूचना शत्रुघ्न काटे यांनी मांडली. त्याला राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी २० फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.
तुमच्या मुलाबराेबर काम करण्याची इच्छा नाही…
राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने सहा वेळा नगरसेवक झालेले ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भाेईर यांना विराेधी पक्षनेते पदाची संधी दिली. महापाैर रवि लांडगे यांचे वडील आणि चुलत्यांबराेबर काम केले आहे. आता रवि यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. आता तुमच्या मुलांबरोबर काम करण्याची माझी अजिबात इच्छा नसल्याचे भाेईर म्हणताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

