पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या धर्तीवर सर्व कार्यालयांमध्ये ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण, योग्य विल्हेवाट आणि ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल,’ असा विश्वास महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या मुख्य कार्यालयात ‘शून्य कचरा कार्यालय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे या वेळी उपस्थित होते. ‘झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करण्यास मदत होईल. या उपक्रमाचा आदर्श घेऊन महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. अशा उपक्रमांमुळे कचरा विलगीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याबाबत जनजागृती होण्यास मदत होईल,’ असे अतिरिक्त आयुक्त बगाडे म्हणाले.

‘शून्य कचरा कार्यालय’ म्हणजे काय?

कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून अंतिम विल्हेवाटीसाठी पाठवल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमीत कमी ठेवणे, हा ‘शून्य कचरा कार्यालय’ या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या मुख्य कार्यालयात या उपक्रमांतर्गत कचरा वर्गीकरणासाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये काच, रद्दी पेपर, धातू, स्वच्छ पिशवी, स्वच्छ प्लास्टिक आणि ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र डबे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संबंधित कचरा योग्य त्या डब्यात टाकणे शक्य होणार आहे. यासोबतच, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खतनिर्मितीची व्यवस्था करण्यात आल्याचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला ‘शून्य कचरा कार्यालय’ हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर पुढाकार घेऊन कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या आव्हानावर मात करण्यास मदत होईल. या उपक्रमाचा आदर्श घेऊन महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त जंगम म्हणाले, युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी लाईटहाऊस प्रकल्प कार्यान्वित असून, युवकांना त्यांच्या आवडीनुसार विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असणे ही विशेष कौतुकाची बाब आहे. बदलत्या काळानुसार रोजगाराच्या संधींमध्येही बदल होत आहेत. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांपुरते मर्यादित न राहता ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक्स यांसारख्या आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे. यासोबतच युवकांना विविध परदेशी भाषांचे ज्ञान देणेही गरजेचे आहे. परदेशातील रोजगाराच्या संधींचा अभ्यास करून त्यानुसार प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास युवकांना जागतिक स्तरावर करिअरच्या अधिक संधी मिळू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.