पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार नव्याने बदलीवर व पदोन्नतीवर हजर झालेल्या अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयात यापूर्वी आठ सहायक आयुक्त संपूर्ण कारभार सांभाळत होते. आता ही संख्या वाढून १६ झाली आहे. नव्या आदेशानुसार नीलेश देशमुख यांची वाहतूक शाखेत, सुदर्शन राठोड यांची गुन्हे शाखा एक, प्रशांत ढोले यांची पिंपरी विभागात, प्रिया ढमाळे यांची म्हाळुंगे विभागात, तर मनीषा कदम यांची सांगवी विभागात सहायक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नतीवर हजर झालेले सुनील पंधरकर यांच्याकडे विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रोहिणी बाणकर यांची सायबर व आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सचिन कदम यांची म्हाळुंगे विभागातून गुन्हे शाखा दोनमध्ये, प्रवीण मोरे यांची देहूरोड विभागात, तर विठ्ठल कुबडे यांची पिंपरी विभागातून हिंजवडी विभागात बदली करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांची सहायक पोलीस आयुक्त पदावर बढतीने बदली झाली. त्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अरविंद पवार यांच्याकडे बावधन, तर रुपाली बोबडे यांच्याकडे पिंपरी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची वाकड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांना दिघी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक हृषीकेश घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
