पिंपरी : अमली पदार्थांच्या अवैध तस्करांचे केवळ जाळे उध्वस्त न करता त्यांच्या आर्थिक मुळावरच घाव घालण्याची धडक मोहीम पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात दाखल अमली पदार्थ व ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख जुनेद अफजल खान आणि त्याची पत्नी फौजिया खान यांनी ड्रग्जच्या काळ्या पैशातून पुरंदर तालुक्यात उभारलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पोलिसांनी गोठवली (फ्रीझ) आहे. मुंबईच्या सक्षम प्राधिकरणाने या कारवाईवर कायदेशीर शिक्कामोर्तब केले आहे.
सांगवी परिसरातील गुन्ह्यात आरोपींकडून ५५.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात ‘मोक्का’ कलमांतर्गत कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या आर्थिक नाड्या तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी जुनेद खान आणि त्याच्या पत्नीने गराडे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील गट नं. २२७४ मध्ये ३ गुंठे (३००० चौ. फूट) जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम केल्याचे उघडकीस आले.
अमली पदार्थांच्या अवैध पैशांतून ही ५५.१६ लाखांची अपसंपदा उभारल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सक्षम प्राधिकारी, मुंबई यांच्याकडे जप्तीचा प्रस्ताव पाठवला. सुनावणीदरम्यान ही मालमत्ता वैध मार्गाने खरेदी केल्याचा कोणताही पुरावा आरोपींना सादर करता आला नाही. त्यामुळे एनडीपीएस कायद्याच्या कलम ६८ एफ (१) अन्वये ही मालमत्ता सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय विकण्यास वा व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केलेली ही पुणे जिल्ह्यातील २०२६ मधील पहिलीच मोठी जप्तीची कारवाई ठरली आहे. अमली पदार्थांच्या काळ्या कमाईतून उभ्या राहिलेल्या आर्थिक साम्राज्यांवर असाच कायदेशीर प्रहार केला जाईल, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.
