पिंपरी : कानठळ्या बसवणारा डीजे, थरथरणारा ‘बेस’ आणि ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे दहीहंडीत उल्लंघन करणाऱ्या ३१ मंडळांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आता पोलिसांचे लक्ष आगामी गणेशोत्सवाकडे लागले आहे. गणेशोत्सवात डीजे विरोधातील कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार आहे. ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास डीजे मालक, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिला आहे.
‘दहीहंडीमध्ये ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ३१ मंडळांवर तीन दिवसांत कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. स्पीकरसह ॲम्प्लिफायर, मिक्सर आणि अन्य ध्वनिक्षेपक साहित्य जप्त केले आहे. गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट केल्यास मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारवाई तीव्र केली जाणार आहे. गणेशोत्सवात मंडळे जास्त असतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर केला जातो. आवाजाची किमान ४० ते कमाल ७५ डेसिबलची मर्यादा आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या मर्यादा वेगळ्या असून शांतता, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रानुसार मर्यादा आहेत. या मर्यादांचा भंग झाल्यास डीजे मालक, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ असे अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.
अध्यक्षांपासून डीजे मालकांपर्यंत कारवाई
ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळाच्या केवळ ध्वनिक्षेपकांवर कारवाई करून प्रकरण संपविले जाणार नाही. नियमभंग करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष, आयोजक तसेच संबंधित डीजेचालक आणि मालक यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले. उत्सवाचा आनंद जरूर घ्यावा, मात्र तो इतरांच्या आरोग्याला आणि शांततेला बाधा आणणारा ठरू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
‘बेस’च्या थरथराटाने नागरिक हैराण
डीजेच्या साउंड सिस्टीममधून बाहेर पडणाऱ्या तीव्र ‘बेस’मुळे केवळ कानांवरच परिणाम होत नाही, तर घरांच्या खिडक्या-दरवाजेही थरथरतात. अनेक निवासी भागांमध्ये घरात बसलेल्या नागरिकांनाही हा आवाज सहन करावा लागतो. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना याचा फटका बसतो. उत्सव साजरा करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, एका मंडळाच्या जल्लोषासाठी संपूर्ण परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ढोल-ताशा, झांज, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांचा नाद हा शहराच्या उत्सव संस्कृतीचा भाग आहे. मात्र, भल्या मोठ्या डीजेच्या आवाजापुढे पारंपरिक वाद्यांचा नादही झाकोळला जात असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
