पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रभागनिहाय स्वतंत्र पथके कार्यान्वित केली असून, खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. खड्ड्यांबाबत आतापर्यंत दोन हजार १६४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांपैकी एक हजार ६०९ खड्डे बुजविण्यात आले आहेत. उर्वरित ५५५ खड्ड्यांची दुरुस्ती सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत शहरातील विविध रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. जुलै महिन्यात झालेला जोरदार पाऊस, गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. दोन महिन्यांत दोन हजार १६४ खड्डे शहरातील रस्त्यांवर पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत असून, कोंडीत भर पडत आहे.
तक्रार प्राप्त होताच पथक घटनास्थळी
खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथक घटनास्थळी जाऊन पाहणी करते. खड्ड्याचा आकार, खोली, रस्त्याची स्थिती, वाहतुकीची वर्दळ आणि पावसाची परिस्थिती याचा विचार करून दुरुस्तीसाठी योग्य साहित्य निवडले जाते. त्यानंतर खड्डा बुजवून कामाची नोंद केली जाते. आतापर्यंत बुजविण्यात आलेल्या एक हजार ६०९ खड्ड्यांपैकी ५५६ खड्डे कोल्ड मिक्स, २३ बीबीएम, ७५४ जीएसबी, १२० पेव्हिंग ब्लॉक आणि १५६ खड्डे काँक्रीटच्या माध्यमातून बुजविण्यात आले आहेत.
पाणी साचत असल्याने खड्ड्यांत भर
प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या स्वतंत्र पथकांना आवश्यक साहित्य, साधनसामग्री, मनुष्यबळ आणि स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही पथके प्रमुख, तसेच अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून आढळणारे खड्डे तातडीने बुजवित आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पुन्हा पाणी साचते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात बुजविलेले काही खड्डे पुन्हा खराब होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी परिस्थितीनुसार पुन्हा दुरुस्ती केली जात आहे.
ठेकेदारांवर कारवाई
पावसाची उघडीप मिळाल्यानंतर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार आहे. पावसाळ्यात रस्ते आणि डांबराचे साहित्य ओलसर असल्याने डांबरीकरणासाठी आवश्यक गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. तात्पुरती दुरुस्ती केलेल्या ठिकाणांची पुन्हा पाहणी केली जाईल. आवश्यकतेनुसार या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येणार आहे. दोषदायित्व कालावधी लागू असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास संबंधित ठेकेदारामार्फतच दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यकारी अभियंत्यांची आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
