पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) मालमत्ता कर देयकांचे घरपोच वाटप महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षातील थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत देयकाबरोबर जप्तीपूर्वीची नोटीसही दिली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र तसेच मोकळ्या जागांसह सुमारे सात लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्वेक्षणात नव्याने आढळलेल्या मालमत्तांची नोंदणी सुरू असून, मालमत्तांची संख्या आठ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या सर्व मालमत्तांच्या कर देयकांचे वितरण महिला बचत गटांमार्फत घरोघरी करण्याचे कामकाज महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळ यांना दिलेले आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने यावर्षी सर्व देयकांचे वितरण पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मोबाइल क्रमांक अद्ययावत करणे, करासंदर्भातील माहिती देणे आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गट फेडरेशनच्या सहाशेहून अधिक महिलांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे.
विविध सवलतींचा ३० जूनपर्यंत लाभ
महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही ३० जूनपर्यंत कराचा भरणा करणाऱ्यांसाठी विविध १६ सवलती जाहीर केल्या आहेत. ३० जूनअखेर संपूर्ण मालमत्ताकराची रक्कम भरल्यास पाच टक्के सामान्यकरात सवलत दिली जात आहे. ऑनलाइन कर भरल्यास पाच टक्के, महिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या सामान्यकरावर ३० टक्के, अपंग व्यक्तीच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या सामान्यकरावर ५० टक्के, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करात ५० टक्के सवलत दिली जात आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात कंपोस्टिंग खत प्रकल्प सुरू असल्यास पाच टक्के, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असल्यास तीन टक्के, शून्य कचरा संकल्पना राबविल्यास आठ टक्के आणि शून्य कचरा, एसटीपी सुरू असल्यास सामान्य करात दहा टक्के सवलत दिली जात आहे.
महापालिका नागरिकेंद्री सेवेला प्राधान्य देत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर देयकांचे घरपोच वितरण केल्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होतो. ही मोहीम केवळ कर संकलनापुरती मर्यादित नसून, महिला सक्षमीकरणालाही चालना देणारी आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत वेळेत कर भरावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
मालमत्ता कर देयकांचे शंभर टक्के वितरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले मोबाइल क्रमांक अद्यावत करून वेळेत कर भरावा. मागील वर्षातील थकबाकीदारांना देयकाबरोबरच जप्तीपूर्व नोटीस देण्यात येत आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
