पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्ष (२०२५-२६) संपण्यास १९ दिवस शिल्लक असतानाच आगामी (२०२६-२७) आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या देयकांचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे. महिला बचत गटामार्फत देयके वितरित केली जाणार असून, समाज विकास विभागाकडे नोंदणी असलेल्या बचत गटांना काम देण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या एक कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, मिश्र, औद्याेगिक, माेकळ्या जागा अशा सात लाख ३२ हजार नोंदणीकृत मिळकती आहेत. याबराेबर खासगी संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणात सापडलेल्या मिळकतींची नाेंदणीही सुरू आहे. अशा आठ लाखांहून जास्त मिळकतींच्या देयकांचे वितरण महिला बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी करण्याची जबाबदारी महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळावर गेल्या तीन वर्षांपासून सोपवली आहे. महिला वेळेत देयके देत असल्यामुळे कर भरण्याचे प्रमाणही वाढले आहे. आगामी आर्थिक वर्षातदेखील महिला बचतगटांच्या माध्यमातून ३१ मेपर्यंत सर्व देयकांचे वितरण करण्याचे नियोजन कर आकारणी व कर संकलन विभागाने नियोजन केले आहे.

शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत जप्तीपूर्वीची नोटीसही देयकाबराेबर बजावली जाणार आहे. घरोघरी देयकांचे वाटप करणे, मोबाइल क्रमांक अद्ययावत करणे अशी कामे बचत गटांमार्फत करण्यात येतील. एका देयकाचा माेबदला म्हणून २० रुपये अदा केले जाणार आहेत. याप्रमाणे आठ लाख देयकांसाठी एक कोटी ६० लाख रुपयांचा खर्च येणार आहे, तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सनियंत्रण व समन्वय यंत्रणेमार्फत देयके वितरित करण्यात येणार असल्याने मंडाळाला दहा टक्के याप्रमाणे १६ लाख रुपये देण्यात येणार आहेत. असे एकूण एक कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च देयके वाटपासाठी होणार आहे.

बचत गटांतील महिलांना देयके वाटपासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिलांना परिसराची माहिती असल्याने देयकावरील पत्त्याचीही यानिमित्ताने दुरुस्ती करण्यात येणार आहे. लवकरच देयकांची छपाई केली जाईल. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून देयके वाटपाचे नियाेजन आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.