पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांनी कराचा भरणा करण्यासाठी दिलेले दोन कोटी ५२ लाख रुपये रकमेचे २७५ धनादेश वटलेच नाहीत. संबंधितांना महापालिकेकडून नाेटीस देण्यात येणार आहे. मिळकतकराचा भरणा न केल्यास मिळकत जप्त करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा करसंकलन विभागाने दिला आहे.
मिळकतरापोटी भरलेले काही धनादेश विविध कारणांनी वटले नाहीत, तर महापालिकेला धनादेश न वटल्याचा दंड बसतो. कागदोपत्री कामही वाढते. करवसुलीलाही विलंब होतो. २०२५-२६ या आर्थिक वर्षात असे दोन कोटी ५२ लाख रुपये रकमेचे २७५ धनादेश वटले नाहीत. आता या मिळकतधारकांकडून धनादेश स्वीकारला जाणार नसून, त्यांना ऑनलाइन वा रोखीच्या स्वरूपातच कराचा भरणा करावा लागेल.
मिळकतकर भरणा प्रक्रियेची वैशिष्ट्ये
- एप्रिल व मेमध्ये मिळून २८० कोटी रुपयांचा मिळकतकर जमा.
- मिळकतकर जमा करणारे एकूण मिळकतधारक : २ लाख ७१ हजार ५
- सर्वाधिक भरणा : वाकड विभागीय कार्यालयात ४० कोटी रुपये.
- सर्वाधिक भरणा निवासी मिळकतधारकांकडून, १९२ कोटी रुपये.
- बिगरनिवासी मिळकतधारकांकडून ५३ कोटी ८७ लाख रुपये
- मिश्र मिळकतधारकांकडून १६ कोटी रुपये
- मोकळी जागा व इतर मिळकतधारकांकडून १९ कोटी रुपये.
- ऑनलाइन भरणा : २ लाख ४३ हजार २०१ मिळकतधारकांकडून २५७ कोटी ९१ लाख रुपये.
मिळकतकरापोटी प्राप्त झालेल्या धनादेशांपैकी दोन कोटी ५२ लाख रुपयांचे २७५ धनादेश वटले नाहीत. ज्या मिळकतधारकांचे धनादेश बाउन्स झाले, त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यांना पैसे भरण्यासाठी मुदत दिली जाईल. मुदतीत करभरणा न केल्यास मिळकत जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
