पिंपरी : दोन क्षेत्रीय कार्यालय निर्मितीची उपसूचना विसंगत विषयाला दिल्याने सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्तांवर माघारीची नामुष्की ओढविली. हा विषय स्थगित करण्याबरोबर क्षेत्रीय कार्यालय निर्मितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाने ही चूक उघडकीस आणली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १३ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक निवडीच्या विषयाला भाजपने दोन नवीन क्षेत्रीय कार्यालय निर्मितीची उपसूचना दिली होती. या विसंगत उपसूचनेच्या आधारे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन नवीन क्षेत्रीय कार्यालयाची निर्मिती करण्याचा आदेश काढला होता. त्यानुसार २५ मे पासून कार्यालये कार्यान्वित केली जाणार होती. या सभेचा सभावृत्तांत कायम करण्याचा विषय मे महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. त्याला शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी आक्षेप घेतला. ‘सभावृत्तांत कायम होण्याअगोदर आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालये निर्मितीच्या विषयावर स्वाक्षरी कशी केली, स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक निवडीच्या विषयाला दिलेली ही विसंगत उपसूचना आहे. याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे’ त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे म्हणाले, ‘क्षेत्रीय कार्यालये निर्मितीचा विषय दप्तरी दाखल करावा. खर्च कमी करण्यात यावा. आम्हाला एकाही प्रभागाचे अध्यक्षपद देऊ नये हे लेखी लिहून देतो’. तर, ‘आर्थिक परिस्थिती बिकट असताना दोन क्षेत्रीय कार्यालये निर्माण करून उधळपट्टी कशासाठी केली जात आहे’, असा सवाल शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी केला. त्यावर महापौर रवी लांडगे म्हणाले, ‘विसंगत विषयाला उपसूचना असल्याने स्थगिती दिली आहे. नवीन सुसंगत विषयाला उपसूचना देऊन विषय मंजूर केला जाईल. दोन क्षेत्रीय कार्यालये निर्मितीचा आदेश आयुक्तांनी रद्द केला आहे.’
प्रकरणाचा अहवाल राज्य शासनाकडे
बोगस उपसूचनेच्या आधारे ठेकेदारांना ६० कोटी रुपयांची देयके दिलेल्या प्रकरणाचा अहवाल चौकशी समितीने दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे सादर केला होता. पुढील कारवाईसाठी हा अहवाल सरकारकडे पाठविला आहे. अहवाल महापौरांना सादर केला जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
बैलगाडी, सायकल, रिक्षा, दुचाकी, मेट्रोने नगरसेवक महापालिकेत
पंतप्रधानांच्या इंधन काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक बैलगाडी, सायकल, रिक्षा, दुचाकी, मेट्रोने महापालिका सभेला आले. महापौर लांडगे, आयुक्त डॉ. सूर्यवंशी हे सायकलने आले, तर राष्ट्रवादीचे राजू बनसोडे, स्वाती काटे आणि प्रतिक्षा लांघी-जवळकर हे बैलगाडीतून आले.
