पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यांमध्ये ६३ नाल्यांद्वारे सांडपाणी, रसायन मिश्रित औद्याेगिक पाणी मिसळत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नद्यांच्या प्रदूषणात भर पडत असल्याने महापालिकेने थेट सांडपाणी नदीत साेडणाऱ्या गृहनिर्माण साेसायट्या, कंपन्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मुळा नदी सुधारचे काम सुरू आहे. इंद्रायणी नदी सुधाराचा आराखडा तयार केला असून ४४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. पवना नदी सुधारचा १५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार आहे. मात्र, निधीअभावी काम रखडले आहे. शहराचे क्षेत्रफळ १८१ चाैरस किलाे मीटर आहे. शहराच्या दक्षिणेस मुळा नदी, उत्तरेस इंद्रायणी आणि शहराच्या मध्य भागातून पवना नदी वाहत आहे. शहराचे क्षेत्र तीन नद्यांच्या पाणलाेट क्षेत्रात विभागले आहे. शहरात सिमेंट काँक्रिट, डांबरी असे १२०० किलाे मीटर लांबीचे रस्ते आहेत. ६५४ किलाे मीटर अंतराच्या सांडपाणी वाहिन्या आहेत.
पवना नदी २४.४० किलाेमीटर, इंद्रायणी २० आणि मुळा नदी १२.४० किलाे मीटर अंतर शहरातून वाहत आहे. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पवना नदीत ३६ नाल्यांद्वारे, मुळा नदीत नऊ नाल्याद्वारे, तर इंद्रायणी नदीमध्ये १८ नाल्यांद्वारे सांडपाणी, रसायन मिश्रित पाणी, औद्याेगिक पाणी विनाप्रक्रिया साेडले जाते. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समाेर आली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने थेट नदीत सांडपाणी साेडणाऱ्या गृहनिर्माण साेसायट्या, औद्याेगिक कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. सांडपाणी पाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद असलेल्या साेसायट्यांचा पाणी पुरवठा खंडित केला जात आहे. दंडात्मक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत २० साेसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.
नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाई
पावसाळ्यात दरवर्षी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. शहरातील अनेक नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले आहे. या नाल्यांवर कारवाईची माेहीम राबविण्याची सूचना आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयामार्फत नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. सर्व नाले अतिक्रमणमुक्त केले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभाेर यांनी सांगितले.
नद्यांमध्ये नाल्याद्वारे विनाप्रक्रिया केलेले सांडपाणी साेडणाऱ्या गृहनिर्माण साेसायट्यांवर कारवाई सुरू केली आहे. एसटीपी बंद असलेल्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित केला जात आहे. नाल्यांवरील अतिक्रमणांवरील कारवाईही सुरू आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
