पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंचीचा कांस्य पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. पुतळा परिसरात स्थापत्य आणि विद्युत विषयक कामांच्या ५० काेटींच्या दाेन विषयांना स्थायी समितीने लाल झेंडा दाखवत दाेन्ही प्रस्ताव तहकूब ठेवले आहेत. हा पुतळा भाेसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असून, स्थायी समितीने आमदारांशी संबंधित प्रस्ताव तहकूब केला आहे.
महापालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे हाेते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. या बैठकीत पाण्याची, नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुलपासून जाधववाडी पंप हाऊसपर्यंत आवश्यकतेनुसार जलवाहिनी टाकणे, मोशीत दफनभूमी विकसित करून अंतर्गत विद्युत विषयक कामे करणे, भक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानक उभारणे यासह विविध विकासकामांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
माेशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्थापत्य आणि विद्युतविषयक काम करण्यासाठी ३२ काेटी ४३ लाख ३५ हजार आणि १७ काेटी ३५ लाख ४७ हजार रूपये खर्चाचे दाेन स्वतंत्र प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले हाेते. मात्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर आतापर्यंत काेट्यवधी रुपये खर्च झाला आहे. कामाच्या दर्जाबाबत आक्षेप घेतले जात आहेत. आता पुन्हा ५० काेटींचे दाेन प्रस्ताव मान्यतेसाठी आले असून निविदांमध्ये रिंग झाल्याचा संशय स्थायी समितीच्या सदस्या सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. आतापर्यंत या पुतळ्यासाठी झालेला खर्च, ५० काेटींमध्ये काय काम केले जाणार आहे, याची माहिती देण्यास सांगितले. मात्र, एकही अधिकारी याबाबत सविस्तर बाेलत नसल्याचा आराेपही त्यांनी केला.
स्थायी समिती अध्यक्षांसह सदस्य करणार पाहणी
छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा राहत असून ही अभिमानाची बाब आहे. महाराजांचा पुतळा उभारण्यास विराेध नसून, त्यांच्या नावाखाली काेट्यवधी रुपयांचे विषय मंजूर करण्यासाठी आमच्यावर दडपण आणले जात आहे. वास्तविकता पुतळ्याच्या कामाबाबत सुरुवातीपासूनच विविध आक्षेप असल्याचे उबाळे म्हणाल्या. पुतळ्याचे काम दर्जेदार व्हावे, त्यामुळेच स्थायी समिती अध्यक्षांसह यांच्यासह सर्व सदस्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत स्थायीत मंजुरीसाठी आलेल्या दाेन्ही विषयांना विराेध नाही. मात्र, सदस्यांनी पुतळ्याच्या कामाची पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार आम्ही सर्व सदस्य पाहणी करणार आहाेत. पुढील स्थायी समितीच्या बैठकीत या विषयांना मान्यता देण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.
