पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. यात जाहिरात फलक भाडेआकारणी, व्यावसायिकांची नोंदणी, दुकानांची ऑनलाइन प्रणाली आणि मिळकतकर आकारणीत सुसूत्रता आणली जाणार आहे. विविध खर्चांत कपात केली जाईल. नवीन कामांपेक्षा आधीचे प्रकल्प पूर्ण करणे आणि महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यास प्राधान्य असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.
‘जाहिरात फलकांच्या (होर्डिंग) भाडेआकारणीत शहराच्या रचनेनुसार अ, ब, क आणि ड अशा वर्गवारीत बदल करून केवळ दोनच विभाग करण्यात आले आहेत. व्यावसायिकांची नोंदणी अत्यावश्यक असून २०१६ पासून कोणत्याही व्यावसायिकाची स्वतंत्र नोंदणी नसल्याने शहरातील व्यावसायिकांची संख्या केवळ दोन हजार आहे. दुकानाच्या आकारानुसार नोंदणी शुक्ल आकारले जाणार असून, ते चारशे ते पाचशे रुपये असणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
बारणे म्हणाले, ‘कोणतेही दुकान ऑनलाइन दिसावे, त्याची जाहिरात दिसावी, त्याचे ठिकाण नागरिकांना कळावे, याची व्यवस्था केली जाणार आहे. मिळकतकर आकारणी रचनेत बदल केला जाणार आहे. वाकडसह उपनगरातील करसंकलन वाढविले जाणार आहे. महापालिकेवर असलेले कर्ज कमी करून शहर कर्जमुक्त करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.’
प्रदूषणमुक्त शहरासाठी कृती आराखडा
‘शहरात धुळीचे प्रमाण वाढू नये, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी बांधकाम सुरक्षा तपासणीकरिता दोन विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील मोठ्या कामांची प्रगती आणि सुरक्षिततेची नियमित देखरेख करावी. तसेच, प्रदूषणमुक्त शहरासाठी कृती आराखडा तयार करावा, असे आदेशही अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला दिले.
महापालिकेच्या ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही, माहिती घेऊन चौकशी केली जाईल. अत्यावश्यक नसलेली नवीन कामे तूर्तास थांबवून केवळ गरजेच्या कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. कोणत्या विभागाने किती कामे केली आणि कोणती प्रलंबित ठेवली, याचा सविस्तर अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविला असल्याचे अभिषेक बारणे यांनी सांगितले.
