पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी नगरसेवकांना भेटत नाहीत, वेळ देत नाहीत. मुख्यालयात असताना स्थायी समितीच्या बैठकीला येत नाहीत. ते स्थायी समितीला फाट्यावर मारत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. दालनात उपस्थित असलेल्या आयुक्तांना तात्काळ बैठकीला बाेलवा, ताेपर्यंत बैठक तहकूब करा, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी वेळमारून नेत बैठकीचे कामकाज पूर्ण केले. 

महापालिकेची स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली. १४ बाेगस उपसूनाद्वारे ठेकेदारांना दिलेल्या ६० कोटी १८ लाख ६८ हजार रूपयांच्या देयकांचा वाढ-घट करण्याचा विषय स्थायी समितीसमाेर मंजुरीसाठी हाेता. हा वादग्रस्त विषय स्थायी समिती समाेर असताना वित्त व लेखा अधिकारी सत्यवान उबाळे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी हे बैठकीला आले नव्हते. आयुक्त चाैथ्या मजल्यावरील दालनात बसले हाेते. हा विषय चर्चेला येताच नगरसेविका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. त्यावर आयुक्त महापालिकेत असल्यानंतर बैठकीला येत असतात, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे  यांनी केला. नगरसेवकांनी चाैथ्या मजल्यावर कर्मचाऱ्याला पाठवून आयुक्त दालनात असल्याची खात्री करून घेतली. 

आयुक्त महापालिकेत असतानाही बैठकीला न आल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. आयुक्त स्थायी समितीला फाट्यावर मारतात. बैठकीला येणे वारंवार टाळतात. त्यांना उत्तरे द्यायची नाहीत. नगरसेवकांसह नागरिकांना भेटत नाहीत. वेळ देत नाहीत. त्यांना तत्काळ बैठकीला बाेलवण्याची मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. लेखा व वित्त अधिकारी उबाळे हेही बैठकीला नव्हते. त्यांना तत्काळ पाचारण करण्यात आले. 

स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी उबाळे यांना खुलासा करण्यास सांगितले. बाेगस उपसूचनेद्वारे देयके दिलेली कामे काेणती हाेती, ठेकेदारांची नावे , किती पैसे दिले आहेत, कामाचा दर्जा तपासला का, याचा सविस्तर अहवाल विभाग प्रमुखांकडून घेऊन पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश दिले. जाेपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल येणार नाही, ताेपर्यंत हा विषय मंजूर करणार नसल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले. 

आयुक्तांचा पुरस्कार पडला अडीच लाखांना?

आयुक्त विजय सूर्यवंशी यांना एका संघटनेने नुकताच पुरस्कार दिला. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी नाश्ता, खुर्च्या, एलईडी स्क्रीन, फुलांचे डेकाेरेशन, छायाचित्र, चित्रीकरण यासाठी अडीच लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाला स्थायी समितीमध्ये उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.