पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत थेट आमदारांचे स्वीय सहायक बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थायी समिती अध्यक्षांसह सदस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी आमदारांचे स्वीय सहायक बैठकीला बसत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेत भाजपची दुसऱ्यांदा सत्ता येऊन पाच महिने पूर्ण झाले. मात्र, महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे वेळाेवेळी दिसून आले. त्यामुळे भाजपच्या शहर काेअर कमिटीने नुकतीच पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. पक्षाच्या विराेधात बाेलल्यास नगरसेवकांवर कारवाईचा इशारा दिला. कोअर कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका स्थायी समितीची प्रत्येक आठवड्यात बुधवारी महापालिका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील कै. मधुकर पवळे सभागृहात बैठक आयोजित केली जाते.

स्थायी समितीच्या बैठकीला अध्यक्षांसह सदस्य आणि अधिकारीच बसू शकतात. बैठक सुरू असताना कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर सुरक्षारक्षक त्याला बाहेरच अडवतात. असे असताना बुधवारी बैठक सुरू हाेताच एका आमदाराचे स्वीय सहायक थेट सभागृहामध्ये येऊन बसले. आमदाराचा माणूस असल्याने सुरक्षा विभागासह प्रशासनाने त्यांना अडविले नाही. आमदाराचा स्वीय सहायक बैठकीला बसल्यानंतर महत्वाच्या विषयावर बोलण्याचे धाडस सदस्यांनी केले नाही. यातून आमदार स्वीय सहायकांमार्फत स्थायी समितीवर नियंत्रण ठेवत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी योजना राबविणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहे. रुग्णालयांसाठी आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आवश्यक औषधे, ऑर्थोपेडिक साहित्य खरेदी आणि विविध प्रकारच्या औषधांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. शहराची आरोग्य व्यवस्था बळकट करणे, अपंग व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, कचरा व शौचालय व्यवस्थापन, तसेच अग्निशामक यंत्रणा सज्ज करण्याच्या कामानांही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका अधिकारी, पत्रकारांचे ओळखपत्र पाहून त्यांना सभागृहात सोडले जाईल. त्यांच्याव्यतिरिक्त यापुढे एकाही बाहेरील व्यक्तीला आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बाहेरील कोणी व्यक्ती स्थायी समितीची बैठक सुरू असताना सभागृहात दिसला, तर सुरक्षारक्षकांनी कारवाई करावी, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी म्हटले आहे.