पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्याबाबत तीन वेळा नोटीस बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या साेसायट्यांचे नळजोड खंडित करण्यात येणार आहेत. त्यासाठी दाेन पथकांची स्थापना करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ६२ साेसायट्यांचे नळजोड खंडित करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात शंभर सदनिका असलेल्या, दीड हजार चाैरस मीटर बांधकाम असलेल्या किंवा दररोज २० हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्थांना पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. सांडपाणी प्रकल्प (एसटीपी) न उभारणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांवर कारवाईची भूमिका महापालिकेने घेतली आहे.
शहरात ४९४ मोठ्या सोसायट्या आहेत. त्यापैकी ३९५ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत, तर वारंवार आवाहन करूनही ९९ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंद आहेत. यांपैकी ६२ साेसायट्यांना पहिली, दुसरी आणि तिसरी नाेटीस दिली आहे. एसटीपी प्रकल्प सुरू करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने आता ६२ साेसायट्यांचे नळजोड खंडित करण्याचा निर्णय झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यात ३७ सोसायट्यांवर कारवाई
उर्वरित ३७ साेसायट्यांचा तिसऱ्या नाेटिशीचा कालावधी संपलेला नाही. त्यामुळे या सोसायट्यांवर दुसऱ्या टप्प्यात कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी पाणीपुरवठा विभागाने दाेन पथकांची स्थापना केली असून, प्रत्यक्षात कारवाईला आता सुरुवात केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता याेगेश आल्हाट यांनी सांगितले.
नाेटीस दिल्यानंतरही ९९ सोसायट्यांमधील एसटीपी बंद असल्याचे आढळून आले. सोसायट्यांनी एसटीपी प्रकल्प सुरू करावेत, यासाठी वेळ दिला. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या साेसायट्यांचे आता नळजोड खंडित करण्यास सुरुवात केली जाईल. पहिल्या टप्प्यात ६२ साेसायट्यांवर कारवाई होणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता
संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
एसटीपी बंद असलेल्या ६२ साेसायट्यांची यादी पर्यावरण विभागाकडून मिळाली आहे. पर्यावरण विभागाच्या पत्रानुसार साेसायट्यांचे नळजोड खंडित करण्यासाठी दाेन मजूर आणि दाेन प्लंबर अशा चार कर्मचाऱ्यांच्या दाेन स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे. दाेन्ही पथके १५ दिवसांसाठी पर्यावरण विभागाला देण्याची सूचना केली आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
