पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट श्वानांसदर्भातील नागरिकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी महापालिकेने प्रभाग कार्यालयनिहाय स्वतंत्र आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तक्रारींचे वेळेत निरसन होण्यास मोठी मदत होईल, असा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला आहे.

मोकाट श्वानांनी केलेल्या हल्ल्याबाबतच्या तक्रारींचे निवारण प्रामुख्याने केंद्र स्तरावरून होत असल्याने कार्यवाहीस वेळ लागत होता. अधिकारी नागरिकांसह नगरसेवकांचे फोन उचलत नव्हते. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागावर रोष व्यक्त केला जात होता. हे ध्यानात घेऊन प्रभाग कार्यालयनिहाय स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

आता प्रभाग स्तरावरच तक्रार निकाली काढली जाईल. नागरिकांनी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीनुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. महापालिकेमार्फत ही सर्व कामे भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार असल्याचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.

तक्रारींचा जलद निपटारा

शहरातील नागरिकांना मोकाट श्वानांच्या त्रासासंदर्भात तक्रारी मांडण्यासाठी प्रभाग कार्यालय स्तरावरच सक्षम यंत्रणा उभी केली जात आहे. प्रत्येक प्रभाग कार्यालयासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल, असा दावा अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी केला.

समन्वय अधिकारी व संपर्क क्रमांक

मदनुरकर इरण्णा – अ प्रभाग – ९१३०५८०७५१
शरद राठोड – ब प्रभाग – ७७७६८१२०९०
राहुल गुलाले – क प्रभाग – ७९७२६०९२७८
निरज हटवार – ड प्रभाग – ७०२०३१४९४३
समीक्षा कुंभार – इ प्रभाग – ९४२१६३२५३८
सुरज शिंदे – फ प्रभाग – ९३७०४४३८१५
निशिगंधा कचवे – ग प्रभाग – ९२८४८०११७७
सुनील कांबळे – ह प्रभाग – ८८८८४४२०४६