पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतिसाठी भाजपने तीन महिलांना आणि दोन पुरुष नगरसेवकांना संधी दिली आहे. नऊ सदस्यीय समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे सर्व समित्यांच्या सभापतिंची निवड बिनविरोध होणार आहे.
सभापतिपदासाठींचे अर्ज बुधवारी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. विधी समिती सभापतिपदासाठी सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राणीमाई पठारे, शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदासाठी संजय काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदासाठी कैलास कुटे आणि शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी रविना अंगोळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पाच विषय समित्यांमध्ये नऊ सदस्य आहेत. त्यामध्ये सत्ताधारी भाजपचे सहा आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन सदस्य आहेत. सहा नगरसेवक असलेल्या शिवसेनेला विषय समित्यांमध्ये स्थान मिळाले नाही. भाजपचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे पाचही विषय समित्यांच्या सभापतिंची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
विषय समित्यांच्या सभापतिंची निवडणूक दोन मार्च रोजी होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हे पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. दोन मार्चला अर्ध्या तासाच्या टप्प्याने पाच विषय समित्यांच्या सभापतिंची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला विधी समिती सभापती निवडणूक होणार आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा आणि शिक्षण समिती सभापतिंची निवडणूक होणार आहे.

