पिंपरी : मंत्रालयातील प्रवेशासाठीच्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली सुरू केली आहे. या अंतर्गत नागरिकांना घरबसल्या महापालिका कार्यालयात प्रवेशासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी नागरिकांना पालिकेच्या http://www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘स्वागतम ई-पास’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे खाते (लॉगिन) तयार करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, छायाचित्र, मोबाइल क्रमांक तसेच आधार क्रमांक यांची नोंद करावी लागेल. खाते तयार करण्याची प्रक्रिया एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक वेळी प्रवेशासाठी स्वतंत्र नोंदणी करता येईल. नोंदणी करताना तसेच पुढील प्रत्येक प्रवेशाच्या वेळी नागरिकांचा मोबाइल क्रमांक ओटीपीद्वारे प्रमाणित केला जाईल. प्रवेश नोंदणी करताना नागरिकांनी किमान एक आणि कमाल तीन विभागांना भेट देण्याची विनंती नोंदवावी लागेल. नोंदणी करताना नागरिकांना ई-पास काढावयाच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांपर्यंतचे (शनिवार, रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून) उपलब्ध दिनांक दिसतील. त्यानुसार आवश्यक दिनांक व विभाग निवडणे बंधनकारक आहे.

प्रवेशद्वारावरील गर्दी टळणार

आगाऊ नोंदणी केल्यास क्यूआर कोड संबंधित प्रवेशाच्या दिवशीच डाउनलोड करता येईल. पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांचा प्रवेश निश्चित केला जाईल. ही प्रक्रिया काही सेकंदांमध्ये पूर्ण होत असल्याने प्रवेशद्वारावर गर्दी किंवा विलंब होणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

प्रणालीची नियमावली

  • पूर्वनियोजित भेट निश्चित करूनच स्वागतम ई-पाससाठी अर्ज करावा.
  • ई-पासची पडताळणी केल्यानंतरच प्रवेश देण्यात येईल. पासमध्ये नमूद केलेल्या वेळ, दिनांक व उद्देशासाठीच प्रवेश वैध राहील.
  • कार्यालयीन कामांसाठी विभागांना भेटीची वेळ ही दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी राहील.
  • अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मंगळवार व गुरुवार दुपारी चार ते सायंकाळी सहा ही वेळ निश्चित करण्यात आलेली असून, फक्त त्याच वेळेस नागरिकांना अधिकारी वर्गाला भेटता येईल.
  • उपोषण, आंदोलनासाठी आलेल्या शिष्टमंडळासाठी मुख्य प्रवेशद्वारावर हस्तलिखित प्रवेशपास
  • ओळखपत्र नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे प्रवेश पास काढावा लागेल.
  • पासचा गैरवापर, बनावट माहिती किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई

नागरिकांना प्रवेश सुलभ करणे, भेटीची डिजिटल नोंद ठेवणे व कार्यालयीन सुरक्षा बळकट करणे या उद्देशाने ‘स्वागतम ई-पास’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिक कोणत्या विभागाला किती वेळा भेट देतात, याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार आवश्यक सुधारणा करणे सोपे होईल, असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.