पिंपरी : आर्थिक वर्षे संपण्यास दोन महिने शिल्लक राहिल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र अशा सात लाख ३२ हजार २९६ मालमत्ता आहेत. आतापर्यंत ७०२ कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. निवडणुकीच्या दीन महिन्याच्या कालावधीत कर वसुली थंडावली होती. आर्थिक वर्षे संपण्यास दोन महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कर वसुलीवर भर दिला आहे. शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर भरण्यासाठी १८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून, या ठिकाणी तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मालमत्ता लाखबंद, नळजोड खंडित

महापालिकेने शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी असलेल्या ४० मालमत्तांवर लाखबंदीची (सील) कारवाई करण्यात आली आहे. १३८ थकबाकी मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत.

सार्वजनिक सुटीच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी सकाळी पावणे दहा ते सायंकाळी पावणे सहावाजेपर्यंत सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांतील भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढविण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्त व सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल करण्यात आले आहेत. निवडणूक विभागाचे कामकाज पाहणारे उपायुक्त सचिन पवार यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

आराेग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडील नागरी सुविधा केंद्राचे कामकाज काढून घेण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयकपद त्यांच्याकडे देण्यात आले आहे. उपायुक्त पवार यांच्याकडील आरोग्य विभाग काढून त्यांना निवडणूक विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. महापालिका निवडणूक हाेताच करसंकलन विभागाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. करसंकलन विभाग महापालिका उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. या विभागाचा तात्पुरता पदभार क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. तो काढून घेण्यात आला आहे.

सहायक आयुक्त अमित पंडीत यांच्याकडील माहिती व तंत्रज्ञान विभाग कायम ठेवत नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडील आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी काढण्यात आली आहे. सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्याकडे निवडणूक व जनगणना विभागाचा कार्यभार कायम ठेवत आरोग्य विभागातील आरोग्य कार्यकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.