पिंपरी पालिकेचा निर्णय

पिंपरी : शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील एखादा जवान देशासाठी शहीद झाल्यास त्या कुटुंबीयांना आधार म्हणून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून याबाबतचे धोरण ठरवण्याची संपूर्ण कार्यवाही करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. पालिका सभेत त्यावर अंतिम मान्यतेचे शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मोठय़ा संख्येने सैनिकी कुटुंबीय राहतात. शिक्षण आणि रोजगाराच्या उद्देशाने ते शहरात स्थायिक झाले आहेत. जम्मू काश्मीर, लेह-लडाख यासह देशाच्या विविध ठिकाणी, कठीण परिस्थितीत सीमेवर हे जवान देशसेवेसाठी तैनात आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धर्तीवर पिंपरी पालिकेकडून सैनिक तसेच शहिदांच्या परिवारांना आर्थिक मदत केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेल्या सैनिक परिवारातील जवान देशासाठी शहीद झाल्यास त्या कुटुंबाला अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, असे याबाबतच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

या मदत निधीचा उपयोग त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्हावा, सैनिकी  परिवाराचे मनोबल वाढावे, जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान राखला जावा, असा हेतू या मागे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.