पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. श्वानांचे संगोपन, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. प्रभागनिहाय श्वानसंगोपन केंद्र उभारावे. त्यासाठी जागेचा शोध घेण्याचा आदेश महापौर रवी लांडगे यांनी पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे बैठकीला उपस्थित होते. लांडगे म्हणाले, ‘शहरातील मोकाट श्वानांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे आरोग्य संवर्धन करणे, तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करावे. प्रभागनिहाय श्वानसंगोपन केंद्र उभारावे. त्यासाठी जागांची पाहणी करावी. या केंद्रांच्या माध्यमातून मोकाट श्वानांचे संगोपन, लसीकरण, उपचार, तसेच नसबंदी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविता येईल. यासाठी संबंधित नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागनिहाय योग्य जागा निश्चित करून त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा.’
नसबंदीचा अहवाल सादर करण्याचा आदेश
शहरातील मोकाट व पाळीव श्वानांची अचूक संख्या किती आहे. श्वानांची नसबंदी आणि लसीकरणाची सद्य:स्थिती याबाबत सविस्तर सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचा आदेश महापौर लांडगे यांनी दिला.
चार वाहनांद्वारे श्वान नसबंदी मोहीम
शहरात प्राणी जन्मनियंत्रणांतर्गत नसबंदी मोहिमेसाठी सध्या चार विशेष वाहने कार्यरत आहेत. या वाहनांद्वारे श्वान पकडणे, नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडले जाते. जखमी किंवा आजारी प्राण्यांवर उपचार करणे आणि नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यासाठीही ही वाहने वापरण्यात येत आहेत. या कामासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्राण्यांशी संवेदनशील पद्धतीने वागण्याबाबत विशेष मार्गदर्शनही देण्यात आले आहे.
श्वानसंगोपन केंद्र उभारण्यासाठी शहरातील काही संभाव्य जागांची प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. आठ प्रभागांत श्वानसंगोपन केंद्र उभारण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
