पिंपरी: पिंपरी पालिकेच्या मामुर्डी, विकासनगर या एकाच प्रभागातील रस्ते डांबरीकरणाची कामे करण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रस्तावास मान्यता देण्याचा विषय प्रशासक राजेश पाटील यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे केली जाणार आहेत का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या विकासनगर, मामुर्डी प्रभागातील ताब्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण तसेच रस्ते विकसित करण्याचा प्रस्ताव ब क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने तयार केला आहे.

या कामाची निविदा रक्कम १५ कोटी २४ लाख रुपये इतकी आहे. या कामासाठी पाच ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. लघुत्तम निविदा असणाऱ्या ठेकेदाराचे दर मान्य करण्याचा प्रस्ताव प्रशासक राजेश पाटील यांच्या मान्यतेसाठी मांडण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारच्या (१२ जुलै) बैठकीत होणार होता. तथापि, आयुक्तांना मुंबईत जावे लागल्याने मंगळवारी याबाबतची बैठक होऊ शकली नाही. एकाच प्रभागातील डांबरीकरणासाठी १५ कोटी खर्च करण्यात येणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.