पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभा शाखेचे कामकाज सुरळीत, कार्यक्षम व वेळेत पार पाडण्यासाठी नगरसचिव राहिलेले महापालिकेचे सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांची मानधनावर नगरसचिव (कराराधिष्ठित) पदावर एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

दरम्यान, महापालिका निवडणूक लढवण्यासाठी पत्नीला भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले होते. पण, उमेदवारी मिळाली नव्हती. आता त्यांना मानधनावर नगरसचिवपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सभा शुक्रवारी पार पडली. महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. नगरसचिव मुकेश कोळप यांची कार्यपद्धत महापौरांना रुचली नाही. त्यातून त्यांनी मानधनावर नगरसचिव नियुक्तीचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासनाने अर्ज मागविले होते. सात दिवसांच्या मुदतीत एकमेव उल्हास जगताप यांचा अर्ज प्राप्त झाला. सर्व अर्हता, निकष पूर्ण करीत असल्याने आणि सभा शाखेविषयी संबंधित कामकाज प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता जगताप यांची आहे. त्यामुळे त्यांची करारपद्धतीने एक वर्षासाठी नगरसचिव पदावर नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाने सभेसमोर सादर केला होता. त्याला मान्यता देण्यात आली. हे पद केवळ करार पद्धतीवर आणि सभा शाखेच्या कामकाजासाठी असल्याने जगताप यांना कोणतेही प्रशासकीय, आर्थिक अधिकार दिले जाणार नाहीत. नियुक्तीमुळे नियमित सेवेत समावेशाचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही.

मिळकतींच्या वर्गवारीवरून भाजपमध्ये मतभेद

मिळकत कर वसुलीतील सुसूत्रेसाठी  ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा वर्गवाऱ्यांमध्ये बदल करुन केवळ  ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोनच वर्गवाऱ्या ठेवण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपमधील मतभेद उघडकीस आले. एप्रिल महिन्यात हा विषय तहकूब केल्यानंतर मंजुरीचा पक्षादेश असतानाही माजी महापौर नितीन काळजे, कुंदन गायकवाड यांनी घेतलेल्या हरकतीमुळे हा विषय पुन्हा तहकूब करण्यात आला आहे.

बोऱ्हाडेवाडीत नगररचना योजना

मोशी बोऱ्हाडेवाडीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्यात येणार आहे. नगररचना योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी नगररचना विभागातील सहायक संचालक संदेश खडतरे यांची नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.