पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात असून भविष्यातील वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी शहरासाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे. परंतु, विहित नमुन्यातील पाणी आरक्षण मंजुरीसाठीचा प्रस्ताव महापालिकेने पाठविले नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्येबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात असून भविष्यातील वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबाबत केले जात आहे, सद्य:स्थितीत शहराला पवना, आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातून पाणी पुरवठा केला जात असला, तरी भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाापलिका प्रशासनाने मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे का, शहरासाठी मुळशी आणि चासकमान धरणातून पाणी आरक्षित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे, असे विविध प्रश्न आमदार महेश लांडगे यांनी विचारले होते. त्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात असून भविष्यातील वाढती पाण्याची गरज भागविण्यासाठी नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची २०३१ मध्ये ५२.७४ लाख लोकसंख्या होईल हे गृहित धरुन पवना धरणातून ६.६५ टीएमसी, भामा आसखेड धरणातून २.१५ टीएमसी आणि आंद्रा धरणातून १.३० टीएमसी पाणी आरक्षण मंजूर केले आहे. महापालिकेने ६ डिसेंबर २०२३ रोजी मुळशी धरणातून अतिरिक्त ९.८१ टीएमसी (७६० दशलक्ष लीटर-एमएलडी) पाण्याची मागणी केली आहे. परंतु, विहित नमुन्यातील पाणी आरक्षण मंजुरीसाठीचा प्रस्ताव महापालिकेकडून अद्याप प्राप्त झाला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेला चासकमान धरणातून पाणी आरक्षण मंजूर नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा
पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर
एकूण – ६५० दशलक्ष लीटर
भामा आसखडचे काम संथगतीने
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदाराला दिलेल्या एक वर्षाच्या (डिसेंबर २०२५) मुदतीतही काम पूर्ण होणार नसल्याने आता प्रकल्पास मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.
