पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाला ७७० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना ६६५ एमएलडीच होणारा पाणी पुरवठा आणि मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने कमी दाबाने, अपुऱ्या पाण्याच्या तक्रारी कायम असताना आता आणखी पाणी कपात केली जाणार आहे. एल निनाेच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात माेठी घट झाल्याने पुढील वर्षभराचा विचार करता १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पत्र दिले जाणार आहे. शहरात आजमितीला १०५ एमएलडी पाण्याची तूट आहे.

शहराला सद्य:स्थितीत पवना धरणातून ५४०, आंद्रातून ९५ आणि एमआयडीसीकडून ३० असा ६६५ एमएलडी पाणी पुरवठा सुरू आहे. शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. या निर्णयाला पुढील महिन्यात सात वर्ष पूर्ण हाेतील. त्यानंतरही एक दिवसाआडच पाणीपुरवठा कायम आहे. एल निनाेच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात पर्जन्यमानात माेठी घट झाली आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना आणि आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. या आदेशाची पिंपरी-चिंचवड शहरातही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेसाठी पवना आणि आंद्रा धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात हाेणार आहे.

वाकडमधील ३४ सोसायट्यांना ५० टक्केच पाणी

पाण्याची तूट असल्याने नव्याने विकसित झालेल्या आणि टोलेजंग इमारती असलेल्या वाकड भागातील २०० ते ५०० सदनिका असलेल्या ३४ गृहनिर्माण साेसायट्यांना ५० टक्केच पाणी पुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे या सोसायट्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शंभर टक्के पाणीपुरवठा करण्याची सोसायटीधारकांची मागणी आहे. परंतु, भामा-आसखेडचे पाणी आल्याशिवाय शंभर टक्के पाणी देता येणार नसल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
 

१६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्याबाबतचे राज्य सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी कपातीबाबत लवकरच पत्र देण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. शहरात मागणीच्या तुलनेत कमी पाणी पुरवठा हाेत आहे. १६ ऑक्टोबरपासून धरणातून जेवढे पाणी मिळेल, त्यानुसार पाण्याचे वाटप केले जाईल. जलसंपदा विभागाचा आदेश आल्यानंतर पाणी पुरवठ्याबाबत नियाेजन केले जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.