पिंपरी : मागील सव्वापाच वर्षांपूर्वी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेले जलवाहिनीचे काम ठेकेदाराला तीन वेळा मुदतवाढ देऊनही पूर्ण हाेऊ शकले नाही. शहरातील वाढती पाणीटंचाई आणि कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे अखेर महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेतले आहे. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. मागील सव्वासहा वर्षांपासून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आणखी वर्षभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने आंद्रा धरणातून १०० आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियोजन केले. खेड येथील वाकी तर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर आणि तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.३० किलोमीटर अंतर १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे नियाेजन केले. हे काम १५ डिसेंबर २०२० रोजी एका ठेकेदाराला दिले. १६२ कोटी रुपयांचे काम १४ डिसेंबर २०२४ पर्यंत संपणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने तीन वेळा दिलेल्या मुदतीतही ठेकेदाराला काम पूर्ण करता आले नाही. सद्य:स्थितीत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
महापालिकेने मार्च २०२६ पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ दिली हाेती. काम वेळेत पूर्ण हाेत नसताना ठेकेदाराने मुदतवाढीसह दर वाढवून मागितला होता. दर वाढवून दिले नाही, तर काम करू शकत नसल्याचे ठेकेदाराने प्रशासनाला सुनावणीत सांगितले हाेते. प्रशासनानेही दर वाढवून दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ३० टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे. शहराची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जलवाहिनीचे काम ठेकेदाराकडून काढून घेतले आहे. त्यानुसार आता अर्धवट कामासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नवीन ठेकेदार नियुक्त करणे, काम पूर्ण करून घेण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शहरवासीयांना वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रकल्पाचा खर्च वाढणार
भामा आसखेड जलवाहिनीचे काम १४ डिसेंबर २०२४ पर्यंत संपणे अपेक्षित होते. या कामासाठी १६२ काेटी रुपयांचा खर्च करण्यात येणार हाेता. मागील सव्वापाच वर्षांत ठेकेदाराला महापालिका प्रशासनाने तीन वेळा मुदतवाढ दिली. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. ३० टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे. काम वेळेत पूर्ण झाले नसल्यामुळे आता ठेकेदार बदलण्याची आणि नव्याने निविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. परिणामी, या जलवाहिनीचा खर्च वाढणार आहे.
सल्लागार संस्थेच्या खर्चात वाढ
आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून एका संस्थेची ३ मार्च २०१८ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून या सल्लागाराची मूळ मुदत ३६ महिने म्हणजेच २ मार्च २०२१ पर्यंत होती. त्यानंतर या सल्लागाराला प्रथम मुदतवाढ २५ महिन्यांची २ मार्च २०२३ पर्यंत, द्वितीय मुदतवाढ १८ महिन्यांची २ सप्टेंबर २०२४ पर्यंत आणि तृतीय मुदतवाढ १८ महिन्यांची २ मार्च २०२६ पर्यंत दिली आहे. ती आणखी वाढवून २ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. मूळ निविदा ७ कोटी २८ लाख ३७ हजार रुपयांची होती. मात्र, सल्लागार संस्थेला ९ कोटी ३१ लाख ५७ हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
भामा आसखेड बंदिस्त जलवाहिनीचे काम ठेकेदाराला मुदतीत पूर्ण करता आले नाही. त्यामुळे ठेकेदाराला काढण्यात आले आहे. जलवाहिनीचे ३० टक्के काम शिल्लक आहे. निविदा प्रक्रिया राबवून नवीन ठेकेदार नियुक्त केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
