पिंपरी : पाच वर्षांपासून रखडलेल्या आणि तीन वेळा मुदतवाढ देऊनही ७० टक्केच पूर्ण झालेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे उर्वरित कामही संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तत्कालीन आयुक्तांनी या ठेकेदाराला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला हाेता. मात्र, नवीन निविदा प्रक्रिया केल्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागू शकेल, म्हणून जुन्याच ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला सध्या मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी १६७ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित असलेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम रखडले आहे. सद्य:स्थितीत ७० टक्के काम पूर्ण झाले असून, ३० टक्के काम बाकी आहे.

मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित ठेकेदाराला बडतर्फ केले. नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने केली. आता नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लोकप्रतिनिधींबरोबर प्रत्यक्ष कामाची पाहणी केली असून, संबंधित ठेकेदाराच्या अडचणी समजून घेतल्या.

नवीन ठेकेदार नियुक्त केल्यास कामाला आणखी विलंब होईल. त्यामुळे जुन्या ठेकेदाराकडून काम करून घ्यायचे, की नवीन ठेकेदार नियुक्त करायचा, असा पेच प्रशासनासमोर होता. नवीन प्रक्रियेमुळे किमान वर्षभरापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामातील अडचणी सोडवण्यासह अटी व शर्तींच्या अधीन राहून काम करण्यास तयार असल्यास पूर्वीच्याच ठेकेदाराकडून जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

जलवाहिनी कामाची सद्यःस्थिती

  • ७० टक्के काम पूर्ण.
  • चार ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प.
  • वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्राचे काम सुरू.
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १८.८० किलोमीटर, १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू.
  • चिखलीत २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारणी.

रखडपट्टीची कारणे

  • जलवाहिनीचा मार्ग बदलणे.
  • वन, सार्वजनिक बांधकाम, ‘एमआयडीसी’कडून परवानगीस विलंब.
  • जागामालकांचा जागेचा ताबा देण्यास विरोध.
  • शेतकरी वारसांतील वादामुळे भूसंपादनास अडचण.

जलवाहिनीच्या ३० टक्के कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया केल्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळे जुन्याच ठेकेदाराकडून अटी व शर्तींच्या अधीन राहून काम करण्याचे विचाराधीन आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.