पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना शुद्ध, मुबलक व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाची महापौर लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पाहणी केली. उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे यावेळी उपस्थित होते.

मौजे वाकीतर्फे वाडा येथे उभारण्यात येत असलेल्या अशुद्ध जल उपसा केंद्राच्या कामाची पाहणी करून तेथून दररोज १६७ दशलक्ष लिटर पाणी कशा प्रकारे शहरासाठी उपलब्ध होणार याची माहिती घेतली. या उपसा केंद्रापासून तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत टाकण्यात येणाऱ्या साडेसात किलोमीटर लांबीच्या १७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रकल्पातील सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करून शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा, अशा सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प हा शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जातील. नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.