PCMC Water Supply Update: भामा आसखेड जलवाहिनीच्या ३० टक्के कामासाठी ठेकेदार बदलल्यास कामाला विलंब होईल, असे सांगत जुन्याच ठेकेदाराकडून काम करण्याची भूमिका सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या कामासाठी ८४ कोटी रुपयांच्या दोन स्वतंत्र निविदा नव्याने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यासाठी दहा महिन्यांची मुदत दिली आहे. परिणामी, हे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पिंपरी-चिंचवडला अजून वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून शहरासाठी १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी बंदिस्त जलवाहिनीद्वारे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराने चार वेळा मुदतवाढ आणि सूचना देऊनही काम पूर्ण केले नाही. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदतवाढ संपूनही अद्याप ३० टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करून नव्याने निविदा काढण्याची विनंती आयुक्तांकडे केली. त्यानुसार, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्या ठेकेदाराला बडतर्फ केले आणि पाणीपुरवठा विभागाकडून उर्वरित ३० टक्के कामासाठी अल्प मुदतीची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

महापालिकेत नव्याने सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींनी मात्र निविदा काढल्यास कामास आणखी विलंब होईल, म्हणून जुन्याच ठेकेदारांकडून काम करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात आयुक्त, पदाधिकारी व संबंधित ठेकेदारांची बैठकही झाली. हे प्रयत्न आता मागे पडले असून, पाणीपुरवठा विभागाने नव्याने निविदा प्रसिद्ध केली आहे. भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत १७०० मिलीमीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे उर्वरित काम करण्यासाठी ३३ कोटी ३५ लाख रुपये खर्चाची निविदा आहे. ब्रेक प्रेशर टँकपासून तळवडे व देहूपर्यंतच्या १४०० मिलिमीटर जलवाहिनीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी ६९ लाख रुपये खर्चाची निविदा आहे. एकूण ८४ कोटी चार लाख रुपये खर्चाच्या या निविदा आहेत. कामाची मुदत दहा महिने आहे.

आणखी वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा

महापालिका प्रशासनाने समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे कारण देऊन २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. या निर्णयाला साडेसहा वर्षे झाली. पण, शहराला दररोज पाणी पुरविणे शक्य झाले नाही. भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध झाल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्यावर प्रशासन ठाम आहे. हे वाढीव पाणी येण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागणार असल्याने शहरवासीयांना आणखी एक वर्ष दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे.

शहराला सध्या होणारा पाणीपुरवठा (आकडे दशलक्ष लिटरमध्ये)

पवना धरण : ५५०
आंद्रा धरण : ८०
एमआयडीसी : २०
एकूण : ६५०

भामा आसखेड जलवाहिनीच्या ३० टक्के कामासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. ठेकेदाराला कामासाठी दहा महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. मुदतीत काम पूर्ण करण्यावर भर असेल. भामा आसखेडचे पाणी उपलब्ध होईपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.