पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी सेवा रस्त्यादरम्यान जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली. अर्धवट व खचलेले रस्ते तत्काळ दुरुस्त न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.

निगडी-प्राधिकरण पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र ते दापोडीपर्यंत एक हजार मिलिमीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी सेवा रस्ता, तसेच बीआरटी मार्ग खोदण्यात आला आहे. जलवाहिनीच्या कामानंतर रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेत. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी, तसेच सल्लागारांकडून ठेकेदाराला बैठकीत लेखी व तोंडी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही दुरुस्ती कामास विलंब होत आहे.

‘रस्त्यातील खड्डे व रस्ता खचल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्धवट कामामुळे अपघात किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील,’ असे नोटिशीमध्ये नमूद आहे. ‘ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, तत्काळ दापोडी ते निगडीपर्यंतचा मार्ग दुरुस्त करून, वाहतूक सुरळीत करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

निगडी ते दापोडी सेवा रस्त्यावर भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्याची मुदत आणखी दोन महिने आहे. मात्र, योग्य प्रकारे दुरुस्तीचे काम न केल्याने रस्त्यावर खड्डे पडत असून, काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्या संदर्भात वारंवार सूचना देऊनही तातडीने दुरुस्ती न केल्याने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. कामात सुधारणा न केल्यास ठेकेदाराकडून दंड वसूल केला जाणार असल्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

सेवा रस्ता धोकादायक

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर जलवाहिनी टाकण्यासाठी निगडी ते दापोडी हा रस्ता खोदला होता. मोरवाडी ते चिंचवड रेल्वे स्थानकादरम्यान जलवाहिनीचे कामपूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. संपूर्ण डांबरीकरण करण्याऐवजी केवळ वरवरची डागडुजी करण्यात आली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. रस्त्यावर सुटी खडी पसरली असून दुचाकी घसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. खड्ड्यामुळे पीएमपीएमएल बस हेलकावे खात आहे. निगडी ते दापोडी समतल विलगाकमधील रस्त्यांचीही चाळण झाली आहे.

खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे अपघात

खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. वाहन खड्ड्यात आदळून चालकाला तसेच वाहनाला दणका बसत आहे. खड्ड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरुन अपघातहोत आहे. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. बीआरटी मार्गांवरही खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. वाहतुकीला संथ गती येत आहे. कोंडीत भर पडत आहे.