पिंपरी : वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढल्याने काही नागरिक महापालिकेच्या नळाला विद्युत माेटार पंप जोडून पाणी घेत असल्याची बाब उघड झाल्यानंतर अशा नागरिकांवर आणि पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वाॅशिंग सेंटरचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, माेशी, चऱ्होली, दिघी, भाेसरी, डुडुळगाव, थेरगाव, दापोडी, काळेवाडी, किवळे, सांगवी, वाल्हेकरवाडीसह शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. ‘नागरिकांनी वाहने धुणे, अंगणामध्ये, रस्त्यावर पिण्याचे पाणी मारणे टाळावे,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे. नागरिक महापालिकेच्या नळजोडाला दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे इलेक्ट्रिक विद्युत मोटार जोडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसतात. त्यामुळे परिसरातील इतर नागरिकांच्या तक्रारी वाढल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

पिंपळे निलख परिसरात नळजोडाद्वारे पाणीउपसा करणाऱ्या नागरिकांचे १२ विद्युत माेटार पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. शहरातील इतर भागांतही माेटार पंप जोडून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या माेटारी जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

जास्त पाणी मिळावे, म्हणून काही नागरिक महापालिकेच्या नळजोडाला विद्युत माेटार जोडून पाणी घेतात. एक मोटार २० घरांचे पाणी खेचून घेते. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो. नळजोडाला मोटार जोडून पाणीउपसा करणारे आणि पिण्याचे पाणी वाहने धुण्यासाठी वापरणाऱ्या वाॅशिंग सेंटरचालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा

पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर

आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर

एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर

एकूण – ६५० दशलक्ष लीटर

भामा आसखडचे काम संथगतीने

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी  भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदाराला दिलेल्या एक वर्षाच्या (डिसेंबर २०२५) मुदतीतही काम पूर्ण होणार नसल्याने आता प्रकल्पास मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त ठरविण्यात आला आहे.

सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे.  धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.